नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नांदेड ग्रामीण, कुंडलवाडी, इतवारा आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, सोन्याचे दागिने चोरी आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घरफोडी करून ६० हजारांचा ऐवज लंपास
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यनगर, धनगाव येथे २६ सप्टेंबर रोजी रात्री २ ते सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी गोपाळ जळबा पाटील (वय ५६, रा. कौशल्यनगर, धनगाव, नांदेड) यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६७/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मांजमकर तपास करीत आहेत.
कुंडलवाडीत घरफोडी; ६४ हजारांचे दागिने चोरीला
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जापूर, ता. बिलोली येथे २६ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, अंदाजे ६४ हजार ५०० रुपये किमतीचे, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी नितीन शिवाजी हिरले (वय ३५, रा. अर्जापूर, ता. बिलोली) यांच्या तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६, कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संगेवार तपास करीत आहेत.
इतवारा येथे सोनसाखळी हिसकावली; ८८ हजारांचे नुकसान
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमजी रोड परिसरात २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वाजेदरम्यान सोनसाखळी चोरीची घटना घडली. फिर्यादी निर्मला पुंजाजी वाडेकर (वय ४८, रा. देहली, ता. किनवट) या नांदेडमधील एमजी रोड परिसरातून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे २२ ग्रॅम वजनाची, ८८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२६, कलम ३०२(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कलंदर तपास करीत आहेत.
भाग्यनगरमध्ये शेतजमिनीच्या व्यवहारातून फसवणूक
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी बाळाजी श्रीमंगले, प्रवीण लिबोंटीकर, अमोल मालेगावकर व राहुल गायकवाड यांनी संगनमत करून सर्व्हे क्रमांक ७३ मधील २१ आर जमिनीच्या खरेदीखतासंबंधी व्यवहारात फसवणूक करून ४३ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी मनीष सुगनचंदजी शर्मा (वय ४६, रा. विशालनगर, नांदेड) यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५७/२०२६, कलम ३१८(४), ३१२(२), ६१(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सोनवणे तपास करीत आहेत. दरम्यान, शहर व जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
