![]()
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकळी एका बसला आज भयंकर आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात बसमधून निघणारे आगीचे लोळ वर मेट्रोच्या रुळापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात मेट्रो लाईन – 7 च्या (रेड लाईन) पुलाखाली आज सकाळी एका धावत्या बसला आग लागली. अपघातग्रस्त बस मालाडच्या दिशेने जात होती. रस्त्यात तिच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक व वाहकाने तातडीने बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली आणि भस्मसात झाली. आगीचे लोळ वर मेट्रो पुलापर्यंत जात होते. मेट्रो व रस्ते वाहतुकीला फटका या आगीमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगीचे लोळ मेट्रो रुळांच्या अगदी जवळ पोहोचत होते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने खबरदारी म्हणून या मार्गावरून जाणारी मेट्रो सुरक्षित अंतरावर थांबवली होती. त्यामुळे कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही तत्काळ तिथे पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. पण तोपर्यंत बस पूर्णतः आगीत भस्मसात झाली होती. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिक येथे बस – पिकअपच्या धडकेत 4 ठार दुसरीकडे, नाशिकमध्ये बस व पिकअपच्या झालेल्या भीषण धडकेत 4 जण ठार व 20 जण जखमी झालेत. सोमवारी पहाटे मालेगाव – मनमाड महामार्गावरील वरहाणे गावालगत ही घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, पिकअप वाहन थेट बसमध्ये घुसली. सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास सर्व प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा हा अपघात झाला. वऱ्हाणे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही भीषण धडक बसली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पिकअपचा चक्काचूर झाल्याने त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सर्व जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईत मेट्रोच्या पुलाखाली धावत्या बसला आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत
