BJP Candidate Ganesh Bidkar Manhandled Pune Case Filed | भाजप उमेदवाराला धक्काबुक्कीचा प्रयत्न: वाढदिवसाच्या कार्यक्रमात घडली घटना; 5 जणांवर गुन्हा, पोलिस तपास सुरू – Pune News



पुण्यातील मंगळवार पेठेत भाजपचे प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एका वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान घडली.

.

आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोपी आणि भाजप उमेदवार उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे यांनी उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.

यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सागर कांबळे यांना रोखले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम नामावडे आणि उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड

पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनांचा दरवाजा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तुंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरील एका वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून तीन लाख रुपयांचे कपडे चोरून नेण्यात आल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाईप, दोन दुचाकी, चोरलेला एक लॅपटॉप, कपडे असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एम. जी. रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिस उपायुुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदीप उकीरडे यांनी ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *