Andekar Family Daughters Campaign Pune Municipal Elections NCP | आंदेकर कुटुंबातील मुलींची भावनिक साद: आता हे थांबायला हवे, पुणे मनपा निवडणुकीतील उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया – Pune News



पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३, रविवार पेठ – नाना पेठ येथील उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

.

राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी दिल्याचा आरोप करत विरोधकांकडून यावर तीव्र टीका केली जात आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या प्रभागात प्रचार करत आहेत.

या संदर्भात बोलताना प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या, “आम्ही जिथे जातो तिथे लोक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे.”

रिया आंदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “लहानपणी मी वडिलांचा प्रचार पाहिला आहे. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आम्हाला पूर्ण करायची आहेत. जे काही घडले, त्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आता हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. सध्या मी आणि माझी लहान बहीण एकट्याच राहत आहोत,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.

प्रियांका आंदेकर म्हणाल्या, “प्रचारात आम्हाला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या कामाची मतदार आठवण काढतात. याच कामाची पोचपावती म्हणून अजितदादांनी कुटुंबीयांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. विरोधक काहीही बोलत असले तरी प्रभागात आंदेकरांचे काम बोलते, हे वास्तव आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *