![]()
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटले आहे की, डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोन तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सुसह्य झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
.
मिहाना पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित “स्मार्ट युगातील गॅजेट्स टेक सवंगडी” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. माशेलकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, दीक्षित डाएटचे डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या संचालक अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या.
डॉ. माशेलकर यांनी सांगितले की, डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत आहे आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे. याचा परिणाम ग्रामीण आणि शहरी अशा सर्वांच्याच जीवनावर होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात या डिजिटल क्रांतीचा सकारात्मक उपयोग होत आहे. क्षयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांच्या अनेक नियमित चाचण्या करणे तंत्रज्ञानामुळे सुलभ झाले आहे. त्यांनी “स्मार्ट युगातील गॅजेट्स टेक सवंगडी” हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आवाहन केले.
डॉ. अरविंद नातू म्हणाले की, डिजिटल क्रांतीमुळे सर्वच क्षेत्रांना नवीन आयाम प्राप्त झाले आहेत. “स्मार्ट युगातील गॅजेट्स टेक सवंगडी” हे पुस्तक भविष्याचा वेध घेणारे आणि सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे.
यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी लेखनामागील भूमिका स्पष्ट केली, तर प्रकाशिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले.
