हदगाव येथे ३० ऑगस्टला शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा
हदगाव : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच शेतकरी दिनाचे औचित्य साधून रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सुमन मंगल कार्यालय, हदगाव येथे शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती करून जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून, हदगाव तालुक्यातील शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यापर्यंत निमंत्रण पोहोचविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
मुख्य नियोजन समिती कार्यक्रमातील प्रोटोकॉल, स्टेज प्लॅन तसेच मान्यवरांच्या स्वागत व आसन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहे. शेतकरी संपर्क व प्रचार समिती प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची नियुक्ती करून शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधणार आहे. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक फोन करून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासह गावोगावी ऑटोमधून प्रचार, WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून माहिती प्रसारित करणे आणि प्रत्येक गावातून शेतकरी बांधवांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय शेतकरी महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी आणि महिला बचत गटांना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे.
मंगल कार्यालय व्यवस्था समिती बसण्याची व्यवस्था, वॉटरप्रूफ मंडप, साऊंड सिस्टिम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पार्किंग व्यवस्था पाहणार आहे. स्टेज व सत्कार समिती स्टेजची सजावट, आसन व्यवस्था व सत्काराचे नियोजन करणार आहे. स्टेजवर मर्यादित खुर्च्या व व्हीआयपी आसन व्यवस्था ठेवण्यात येणार असून, मागील बाजूस २० x १० फूट आकाराचा मुख्य बॅनर लावण्यात येणार आहे.
स्वागत व भोजन समिती स्वागत गेटवर पाहुण्यांचे स्वागत, मान्यवरांचा सत्कार तसेच उपस्थित शेतकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करणार आहे. कोणताही शेतकरी उपाशी जाऊ नये आणि भोजनावेळी गर्दी होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
मीडिया व फोटो समिती कार्यक्रमाचे छायाचित्रण, ड्रोनद्वारे चित्रीकरण, स्थानिक पत्रकारांना निमंत्रण तसेच Facebook Liveची व्यवस्था पाहणार आहे. तर सुरक्षा व शिस्त समिती कार्यक्रमस्थळी शिस्त व सुरक्षा व्यवस्था सांभाळणार असून, स्थानिक पोलिसांशी समन्वय साधण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
– सकाळी १०.०० वाजता : सर्व समित्यांची उपस्थिती व साऊंड चेक
– सकाळी ११.०० वाजता : गावोगावून शेतकऱ्यांचे आगमन
– दुपारी १२.०० वाजता : शेतकरी बांधवांची आसन व्यवस्था
– दुपारी १२.३० वाजता : निमंत्रित मान्यवरांचे स्वागत
– दुपारी १.१५ ते ३.०० : मान्यवरांची भाषणे
– दुपारी ३.०० वाजता : आभार प्रदर्शन व राष्ट्रगीत
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शनिवार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता तामसा येथे आणि सायंकाळी ४ वाजता हदगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी लेखी स्वरूपात देणे अपेक्षित असून त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच २८ ऑगस्ट रोजी सुमन मंगल कार्यालय, हदगाव येथे सर्व समित्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
शेतकरी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग राहावा आणि कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडावा, यासाठी आयोजन समितीकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे.

