अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम
नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे.
सदर मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात, गुटखा विक्री करणाऱ्या (3) इसमांविरुद्ध (2) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 12,29,100/- रुपये किंमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (28) इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांचे विरुद्ध (9) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 54,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू विक्री करणाऱ्या (27) आरोपींविरुद्ध (27) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 40,430/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोबतच, कोटपा अन्वये (4), तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (45) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 50,74,578/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खबर हेल्पलाइन ला वाढता प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत.
नागरिकांनी आपल्या भागातील गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
Post Views: 9
