![]()
मुंढवा-मांजरी रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतीच घडली.
.
मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव भूषण कैलास अहिरराव (वय ३५, रा. अर्थव कॉॅम्प्लेक्स, मांजरी बुद्रुक) असे आहे. भूषण यांचे भाऊ पंकज कैलास अहिरराव (वय ३२) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण आणि पंकज हे दोघेही खासगी ठिकाणी नोकरी करतात. मुंढवा-मांजरी रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात भूषण गंभीर जखमी झाले, तर पंकज यांनाही दुखापत झाली. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला.
गंभीर जखमी झालेल्या भूषण आणि पंकज यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भूषण यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत हडपसर-सासवड रस्त्यावरही भरधाव टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनोहर वामनराव धर्माधिकारी (वय ५७, रा. धर्माधिकारी चाळ, नेहरूनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. धर्माधिकारी यांच्या पत्नी उषा (वय ४७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माधिकारी हे हडपसर-सासवड रस्त्याने जात असताना भेकराईनगर परिसरात भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धर्माधिकारी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक खंदारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
