Thackeray Brothers Alliance Seven BMC Announced Sanjay Raut Marathi Unity | महाराष्ट्राला आज मराठी ऐक्याचा मंगल कलश अर्पण: ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ हे भाजप-शिंदे गटाचे काम – संजय राऊत – Maharashtra News



“आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आणि प्रेरणादायी आहे. ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आला आणि मराठी माणसाने आनंदोत्सव साजरा केला, अगदी तसाच मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या

.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना उबाठा आणि मनसेच्या युतीवर भाष्य करत,विरोधकांवर सडकून टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, सकाळी ११:३० वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू ‘शिवतीर्था’वर एकत्र येतील. तिथे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतील. “ही केवळ राजकीय युती नसून महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आहे,” असे राऊत म्हणाले. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल.

सात महापालिकांमध्ये ‘मशाल-इंजिन’ एकत्र

राऊत यांनी स्पष्ट केले की, केवळ मुंबईच नाही तर राज्यातील प्रमुख सात महानगरपालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. “इतर ठिकाणीही जिथे जिथे शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र लढण्याबाबत सकारात्मक आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

दिल्लीच्या बुटचाट्यांनी मार्गदर्शन करू नये

ठाकरे बंधुंच्या युतीवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “कोण काय ‘भडबंजे’ बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे सगळे लाचार आणि दिल्लीचे बुटचाटे लोक आहेत. त्यांना ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे पोटात भीतीचा गोळा आला आहे आणि तीच भीती त्यांच्या तोंडातून बाहेर पडतेय. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही.”

मराठी माणूस आता एकच!

“मराठी माणूस एक आहे आणि तो एकच राहील. त्याचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच करतील,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मुंबईसह संपूर्ण राज्याचे राजकारण आता पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ हे भाजप-शिंदे गटाचे काम

भाजप आमदार पराग शहा यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याच्या घटनेवरून राऊतांनी भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, “मुंबईच्या भररस्त्यात एका गरीब मराठी रिक्षावाल्याला मारहाण करण्याची हिंमत भाजप आमदारांमध्ये येते कुठून? ही दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरीब मराठी माणसाला मारहाण करणे हेच भाजपचे धोरण आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “उत्तर भारतीयांना घाबरवणे आणि ‘बटोगे तो पिटोगे’ सारखे पोस्टर लावून समाजात तेढ निर्माण करणे, हे भाजप आणि शिंदे गटाचेच पाप आहे,” असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेने कोणाला इथे विनाकारण मारले, हल्ला केला हे दाखवून द्यावे, असेही ते म्हणालेत.

जागावाटपाचे सूत्र ठरले: ‘जिंकेल त्याची जागा’

आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, “जागावाटपासाठी आमचे धोरण स्पष्ट आहे – ‘मेरीट’वर, म्हणजेच गुणवत्तेवर जागांचे वाटप होईल. जिंकेल त्याची जागा, हेच सूत्र आम्ही शिवसेना आणि मनसे युतीसाठीही राबवले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या महापालिकांच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *