Massive fire breaks out at Mira Industries of Chandur Railway | चांदूर रेल्वेच्या मीरा इंडस्ट्रीजला भीषण आग: चणाडाळ, कुटार, यंत्रसामग्री जळून खाक; पाच ठिकाणांहून बंब मागवले – Amravati News



चांदूर रेल्वे येथील कुऱ्हा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया मिलमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत चणाडाळ, चणा, कुटार आणि मिलमधील महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाल

.

आग इतकी भीषण होती की, चांदूर रेल्वे येथील अग्निशमन विभाग ती आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा ठरला नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीसह धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा येथूनही अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. एकूण पाच ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सुरुवातीला ही आग कुणाच्याही लक्षात आली नाही. मंगळवारी सकाळी मिलमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मिल मालक पियुष गंगन आणि सचिन गंगन यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मिलचे शटर उघडताच आगीचे रौद्र रूप दिसून आले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चांदूर रेल्वे येथील पंपिंग स्टेशनमधून अंदाजे ३० ते ३५ फेऱ्या मारत पाण्याचा मारा केला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या मोहिमेत अग्निशमन विभागाचे प्रमुख अमोल भुजाडे, जितू कर्से, पंकज इमले, वाहन चालक अमोल कडू, फायरमन नीरज दुबे, मयूर घोडेस्वार यांच्यासह अमरावती, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगीची माहिती मिळताच शहरातील अनेक नागरिक आणि परिसरातील तरुणांनीही घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, आगीच्या नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. आगीचे नेमके कारण तपासादरम्यान स्पष्ट होईल. धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे-अडसड यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *