![]()
कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये आणि खासगी
.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील ‘भुताचा माळ’ परिसरात आली असता, बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले.
पाठलाग करून गाठले आणि लुटले
बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो आणि प्लास्टिक पोत्यातील 26 किलो अशी एकूण 60 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
थांबलात तर मारून टाकू!
लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बस चालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला. “या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू,” अशी धमकी देऊन ते पसार झाले. प्रचंड घाबरलेल्या बस चालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून ‘112’ क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांच्या वर्णनावरून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. निवडणुकीच्या जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीती पसरली असून, अशा प्रकारे महामार्गावर बस लुटली गेल्याने खासगी बस कंपन्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
