Dr. Kailash Kadam resigns as Pimpri-Chinchwad Congress city president | डॉ. कैलास कदम यांचा पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा: वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले, पण प्राथमिक सदस्य म्हणून काम करणार – Pune News



पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि. २२) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला.

.

डॉ. कदम यांची पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी निवड झाली होती. तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांची नियुक्ती केली होती.

वेणुगोपाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात डॉ. कदम यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मला कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती. मी पुढे काँग्रेसचा प्राथमिक सदस्य म्हणून काम करत राहीन.”

डॉ. कदम यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी, ते काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून कार्यरत राहतील, असे पत्रात स्पष्ट केले आहे.

डॉ. कदम यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले की, त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच पिंपरी-चिंचवड शहर आणि औद्योगिक पट्ट्यात काँग्रेससाठी काम केले आहे. १९९७ मध्ये राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार असताना, त्यांनी गांधीनगर पिंपरी वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

२००७ मध्ये त्यांनी खराळवाडी वॉर्डमधून निर्मला कदम यांना निवडून आणले. २०१२ मध्ये गांधीनगर प्रभागातून स्वतःसह दोन्ही उमेदवार आणि खराळवाडी प्रभागातून सद्गुरु कदम यांना निवडून आणण्यात यश मिळवले. याच काळात त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गटनेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी काँग्रेसने दिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चिंचवडमधून उमेदवारी मिळाली होती.

डॉ. कदम यांच्या मते, पक्ष अडचणीत असतानाही त्यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी या काळात पक्ष वाढीसाठी १०० टक्के योगदान दिल्याचेही नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *