[ads1]
![]()
अमरावती जिल्ह्यात जिल्हा शोध व बचाव पथकाने दोन वेगवेगळ्या बचाव मोहिमा राबवून १६ जणांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरातून ९ जणांना वाचवण्यात आले, तर चांदुर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथील मोखळ नदीच्या पुरातून ७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दोन्ही घटना नुकत्याच घडल्या आहेत. पहिली घटना रात्री ११ वाजता घडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात फोन आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळ बेंबळा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे ८ ते १० लोक अडकल्याची माहिती मिळाली. ही माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या आदेशाने लगेच बचावकार्य सुरू झाले आणि रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने टॉर्चच्या उजेडात पाहिले असता, लोक घरांच्या छतावर चढून मदतीची वाट पाहत होते. पथकाला पाहताच त्यांच्या जीवात जीव आला. बोटीच्या मदतीने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पाण्याचे हेलकावे आणि रात्रीची वेळ यामुळे बोट चालवण्यात अडचणी येत होत्या, पण पथकाने अखेर यश मिळवले. या बचाव मोहिमेत हनुमंत उके, रवी मेश्राम, सुभाष भोईर, सतीश मारबते, आशिष उके, गौरव मारबते, ओम गिरी, अमोल भोयर आणि अनिकेत केवट या १८ ते ३५ वयोगटातील नऊ नागरिकांचे प्राण वाचले. विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी एस गायकवाड, गणेश कासदेकर, सूरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे या बचाव पथकातील सदस्यांनी हे काम केले. दुसरी घटना चांदुर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथे घडली. साहेबराव जाधव, त्यांची पत्नी सावित्री जाधव, मुलगा जेतालाल जाधव आणि इतर कुटुंबीय पूनम जाधव, अनन्या जाधव व रिना जाधव हे गावी परत येत असताना त्यांचे वाहन मोखळ नदीच्या पुरात अडकले. रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात फोन आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार, आरडीसी संतोष काकडे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या नेतृत्वाखाली शोध व बचाव पथकाला घटनास्थळी रवाना केले. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पथक तेथे पोहोचले. पुराच्या पाण्यातून ४ महिला, २ पुरुष आणि एका लहान बाळासह एकूण सात जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
[ads2]
दोन बचाव मोहिमांतून 16 जणांना जीवदान:अमरावतीत जिल्हा शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून वाचवले
















Leave a Reply