जालना शहरातील तरुण उद्योजक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पंडितराव धानोरे यांच्या पुतण्याने स्वतःच्या कारमध्ये डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली. त्यानंतर ती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे शहरा
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, सागर श्रीराम धानोरे (35) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण उद्योजकाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह रविवारी पहाटे शहरातील अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल लगत आढळला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील मस्तगड महावितरण कार्यालय परिसरातील भवानीनगर येथे राहणारे श्रीराम धानोरे हे शनिवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. रविवारी पहाटे त्यांची कार अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान असलेल्या कलावती हॉस्पिटल जवळ उभी असल्याचे निदर्शनास आले.

ही कार रात्रीपासून तिथेच उभी होती. त्यामुळे स्थानिकांच्या मनात त्याविषयी संशय निर्माण झाला. अखेर त्यांनी ती बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यात कारच्या ड्रायव्हिंग सीटवर सागर धानोरे यांचा मृतदेह आढळून आला.
सागर धानोरे यांनी उजव्या बाजूने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही गोळी त्यांची कवटी चिरत आरपार निघून गेली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. आता हे पिस्तूल त्यांच्याकडे कुठून आले? याची माहिती पोलिस गोळा करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला आहे.

रिअल्टी क्षेत्रात होते सक्रीय
उल्लेखनीय बाब म्हणजे सागर धानोरे यांचाच प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय होता. त्यांच्यावर काही किरकोळ गुन्हेही दाखल होते. शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पंडितरावर धानोरे यांचे हे पुतणे होते. असे असले तरी सागर हे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपला तपास सुरू केला आहे.
