![]()
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची , मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला उदंड प्रतिसाद मिळतोय. या टॉक शोचे प्रभाग क्रमांक 20 मध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय आ
.
टॉक शोमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रोहन आचलिया यांनी थेट शिंदेसेनेवर आरोपांची झोड उठवली. आमच्या नगरसेवकांनी प्रभागात केलेली कामे आज शिंदे गट आपली म्हणून सांगत आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे आमच्यासोबत असताना ज्या विकासकामांना सुरुवात झाली, त्याचे श्रेय आता महायुती घेऊ पाहत आहे, असा आरोप त्यांनी केला.
उमेदवारच नाहीत…
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केलेल्यांनाही रोहन आचलिया यांनी डिवचले. तिकडे गेले आहात, तिकीट मिळाले नाही तरी तिकडेच रहा. निवडणुकीपुरते इकडे-तिकडे येऊ नका, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. आचलिया यांच्या आरोपांना महायुतीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले. तुमच्याकडे उमेदवारच नाहीत. कुणी नाराज झाले की त्यालाच उमेदवारी देण्यावर तुमची भिस्त आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, काहीही झाले तरी पक्ष बदलणार नाही, असा प्रतिहल्ला ठाकरे गटावर करण्यात आला. त्यामुळे प्रभाग 20 मधील राजकीय लढत अधिकच रंगतदार होताना दिसत आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न…
प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. गुळगुळीत रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढत असून स्पीड ब्रेकर नसल्याने मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते चांगले आहेत, पण सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत. पोलिस गस्त वाढवून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी महिलांनी केली.
दिवसाआड पाणी द्या…
प्रभागातील समस्या येथेच थांबत नाहीत. शिवशंकर कॉलनी परिसरात 8 ते 12 दिवसांनी पाणी येते. एवढे दिवस पुरेल इतका पाणीसाठा करण्याची आमच्याकडे सोय नाही. किमान एक दिवसाआड तरी पाणी मिळावे, अशी मागणी नागरिकांनी मांडली. न्यू बालाजी नगर, बौद्ध नगर, उत्तम नगर या भागांत अरुंद रस्ते आणि पार्किंगची मोठी समस्या आहे. मयूरबन कॉलनीत अरुंद पूल, घंटागाडी न येणे, कचरा उचलण्यात होणारी दिरंगाई अशा तक्रारीही नागरिकांनी केल्या.
सांडपाणी, कचरा, ओपन स्पेस…
प्रभागात अनेक ठिकाणी उघडे सांडपाणी, जागोजागी कचरा, सार्वजनिक शौचालयांची कमतरता आणि विकसित न झालेल्या ओपन स्पेस ही देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांकडे पाहताना आमच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणारा व्यक्तीच नगरसेवक व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
अभ्यासिका, जिम उभारणी…
दरम्यान, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाणीप्रश्नावर आश्वासन दिले. येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांत शहराला मुबलक पाणी मिळणार आहे. पाइपलाइनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. विरोधकांनी मांडलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. तरुणांनीही आपल्या अपेक्षा मांडल्या. परिसरात अभ्यासिका उभारावी. पोलिस व लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी जिम सुरू करावे, अशी मागणी एका तरुणाने केली. माजी नगरसेविका साधना सुरडकर यांनी सिमेंट रस्त्यांसोबतच ओपन स्पेसमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मनपाने पुढाकार घ्यावा, असे मत मांडले.
अशी आहे प्रभागाची व्याप्ती…
छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 20 मध्ये सिंधी कॉलनीचा काही भाग, बालाजीनगर, टिळकनगर, उल्कानगरीचा काही भाग, जयविश्वभारती कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, उत्तमनगर, चेतनानगर, गादिया विहारचा काही भाग येतो. नागरिकांना येथून चार नगरसेवक निवडून द्यावे लागतील. येथे एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण सुटले आहे.
