Dr Shripal Sabnis Nonviolent Struggle Rotary Marathi Literature Conference | डॉ. श्रीपाल सबनीस यांची रोटरी साहित्य संमेलनात मुलाखत: ‘माझा संघर्ष अहिंसावादी’ या भूमिकेवर केले स्पष्टीकरण – Pune News



ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रोटरी मराठी साहित्य संमेलनात ‘माझा संघर्ष अहिंसावादी’ या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले. माणसाचे सामर्थ्य आणि मर्यादा, तसेच संवाद आणि संघर्ष यांच्या आधारावर आपली विवेकवादी

.

या संमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख सुनीताराजे पवार यांनी डॉ. सबनीस यांची मुलाखत घेतली. या मनमोकळ्या संवादातून डॉ. सबनीस यांचे ब्राह्मणी कुटुंब, घरातील धार्मिक-नैतिक संस्कार आणि रझाकारांशी त्यांच्या वडिलांनी केलेला संघर्ष असे अनेक अपरिचित पैलू उलगडले.

डॉ. सबनीस यांनी सांगितले की, त्यांचा जन्म जमीनदार ब्राह्मण कुटुंबात झाला. दया, करुणा, क्षमा, सहवेदना आणि गरिबांविषयीची कळकळ हे संस्कार घरातूनच मिळाले. मात्र, अभ्यासाला सुरुवात झाल्यावर त्यांना विवेकवादी भूमिकेचे महत्त्व पटले. याच विचारातून त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या ‘बहिष्कृत भारता’च्या संदर्भात पीएचडीचे संशोधन पूर्ण केले आणि आपली वैचारिक भूमिका ठाम ठेवून आंबेडकरवादाची नव्याने मांडणी केली.

साहित्याचा ध्येयवाद दुःखामध्येच आहे, यातून त्यांना संवादी बाजूचे महत्त्व लक्षात आले. आपण नेहमीच संवादी राहिलो आहोत, असे ते म्हणाले. जिथे संवाद संपतो आणि अन्याय थांबत नाही, तिथे नाईलाजाने संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. मात्र, आपला संघर्ष अहिंसावादी असून, विद्रोहदेखील अहिंसावादी असला तरच तो अर्थपूर्ण ठरतो, असे त्यांचे मत आहे. यातूनच विवेकी विद्रोहाचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून त्यांनी नव-आंबेडकरवादाची मांडणी केली आहे.

आपल्या घरी सुरुवातीपासूनच शेतकरी, आदिवासी, दलित, भटके, विमुक्त आणि विद्यार्थ्यांचा सतत वावर असे. त्यांच्या चळवळींशी आपण नेहमीच संबंधित राहिलो, असे डॉ. सबनीस यांनी नमूद केले. त्यांच्यासोबतच महापुरुषांच्या चरित्रांचा आणि लेखनाचा अभ्यास केला. डॉ. आंबेडकर स्वतः जातीवादी नव्हते, परंतु आंबेडकरवादी चळवळ जातीवादी बनली आणि त्यात कर्मठपणा वाढला, जो आपल्याला निषेधार्थ वाटला, असे त्यांनी स्पष्ट केले.

समाजात विविध ‘इझम्स’ वेगवेगळ्या काळात उदयास येतात आणि वाढतात, ती त्या त्या काळाची निर्मिती असते. त्यामुळे धुरिणांनी विवेकाच्या अधिष्ठानावर नवा विचार, नव्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मांडायचा असतो. मात्र, यासाठी महापुरुष हेही माणूसच होते आणि त्यांनाही मर्यादा होत्या, याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्यांनी वैचारिक लेखनासाठी सामर्थ्याप्रमाणेच महापुरुषांच्या मर्यादांचाही विचार केंद्रस्थानी ठेवला. कुठल्याही विशिष्ट ‘वादी’ भूमिकेतून महापुरुषांकडे न पाहता, मानवतेच्या भूमिकेतून आपण मांडणी केली, असे सांगत सबनीस यांनी आपल्या वैचारिक आणि समीक्षात्मक लेखनाचा प्रवास उलगडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *