![]()
डी.ई.एस. पुणे विद्यापीठाने जानेवारी २०२६ पासून दोन वर्षांचा पूर्णवेळ बी.एड. अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षक-शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, व्यावहारिक प्र
.
सध्या शिक्षक होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या घटत असली तरी, दर्जेदार शिक्षकांची मागणी अनेक संस्थांकडून सातत्याने होत आहे. ही तफावत लक्षात घेऊन आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विकसित भारताच्या उभारणीत शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान असल्याने, नव्या आव्हानांचा वेध घेण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वतःच्या शाळांमध्ये (इयत्ता पहिली ते बारावी) प्रत्यक्ष सखोल सरावाची संधी मिळेल. चार सत्रांपैकी तीन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. या शाळांमधील अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या तुकड्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील.
हा अभ्यासक्रम केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून, प्रत्यक्ष सराव, मानसिक क्षमता वर्धन, सामाजिक संवेदनशीलता, नागरिकता, मानवी हक्क व कर्तव्ये, पर्यावरण, लिंगसमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रासमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करेल. स्वयंसेवी संस्थांबरोबर काम, सहभागी शिक्षण उपक्रम आणि त्यावर आधारित मूल्यमापन ही या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
यूजीसी आणि एनईपीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२८ असा असेल. प्रवेशासाठी कोणत्याही पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची बी.एड. प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. मागील वर्षी दिलेल्या प्रवेश परीक्षेचे गुण जानेवारी २०२६ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील.
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि संसाधने विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत. शिक्षण-शास्त्र विभाग हा विद्यापीठातील सहावा विभाग असेल. यापूर्वी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मानवता शास्त्र, डिझाइन व कला, तसेच विज्ञान व गणित हे विभाग कार्यरत आहेत.
समाज अध्ययन आणि क्षमता संवर्धन केंद्र हा शिक्षण शास्त्र विभागाचा एक महत्त्वाचा आयाम असेल. या केंद्रातर्फे शिक्षण, सहकार, महिला आणि स्वयंसेवी संस्था अशा समाजाच्या विविध क्षेत्रांतील घटकांसाठी प्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबवले जातील. संशोधन, प्रशिक्षण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीद्वारे हे केंद्र संबंधित क्षेत्रातील धोरण निर्धारणालाही मदत करेल. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन प्राध्यापक डॉ. दिशा राजाध्यक्षा यांनी केले आहे.
