![]()
राज्याची सुरक्षा यंत्रणा आणि कारागृह प्रशासनासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाच्या कडक बंदोबस्ताला सुरुंग लावत आतमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाल्याचे
.
घटनेचा तपशील असा की, 10 डिसेंबर रोजी सकाळी 9:40 च्या सुमारास कारागृह प्रशासनाकडून नियमित तपासणी सुरू होती. यावेळी मंडल क्रमांक 7 मधील यार्ड क्रमांक 1 आणि 4 मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपासणी पथकाने जेव्हा बंदी दिलीप कचरू सोळुंके याची बारकाईने झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे असलेला अमली पदार्थांचा साठा पाहून अधिकारीही अवाक झाले. त्याच्याकडे 104 ग्रॅम चरस, 31.5 मिलीग्रॅम गांजा सदृश पदार्थ, 4 मिलीग्रॅम एम.डी. आणि अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारे 15 रोलिंग पेपर असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वप्नील दिनेश उनवणे याच्या सांगण्यावरून एका बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे अमली पदार्थ अत्यंत बेकायदेशीर मार्गाने कारागृहाच्या आत पोहोचवले होते. कारागृहाच्या तटबंदी आणि चोख पहारा भेदून हे अमली पदार्थ आतमध्ये आलेच कसे, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तस्करीच्या मागे कारागृहातील अंतर्गत कोणाचे संगनमत आहे का? किंवा बाहेरून हे पदार्थ भिंतीवरून फेकले गेले की कच्च्या कैद्यांच्या माध्यमातून आत आले? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नाशिक रोड कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले असून, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
