Foreigners Teach Traffic Discipline Bikers Riding Sidewalk Rakshak Chowk CCTV Footage Photos VIDEOS | फुटपाथवरून धावणाऱ्या गाड्यांनी लाज काढली: परदेशी पाहुण्यांनी दिला दुचाकीस्वारांना धडा; रक्षक चौकातील VIDEOS व्हायरल – Mumbai News



पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार नवीन नाहीत. वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वाहनचालक सर्रास नियम तोडताना दिसतात. विशेषतः दुचाकीस्वारांकडून फुटपाथवरून वाहन चालवण्याची बेशिस्त प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे

.

सांगवी येथील रक्षक चौक हा पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा आणि कायम वाहतूक कोंडीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या चौकात रोजच वाहनांची गर्दी होते आणि याच गर्दीचा गैरफायदा घेत अनेक दुचाकीस्वार पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून आपली वाहने चालवतात. या प्रकारामुळे वृद्ध, महिला, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला. त्यांनी केवळ मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून थांबण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून दुचाकीस्वारांना अडवले आणि हा रस्ता चालण्यासाठी आहे, गाडीसाठी नाही, असे ठामपणे सांगितले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे परदेशी नागरिक अत्यंत संयमाने, पण स्पष्ट शब्दांत दुचाकीस्वारांना समज देताना दिसत आहेत. त्यांनी कोणताही वाद न घालता, कोणत्याही आक्रमक भाषेचा वापर न करता, केवळ नागरी शिस्तीची आठवण करून दिली. काही दुचाकीस्वार सुरुवातीला गोंधळले, तर काहींच्या चेहऱ्यावर लाज स्पष्टपणे दिसत होती. अखेर अनेकांनी आपली वाहने फुटपाथवरून खाली उतरवून मुख्य रस्त्यावर घेतली. या घटनेनंतर तेथील काही नागरिकांनी परदेशी पाहुण्यांचे कौतुक केले, तर काहींनी आपल्या शहरातील नागरिकांवर टीका केली. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना आपल्याला शिस्त शिकवावी लागते, ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही आणि पोलीस यंत्रणा कार्यरत असतानाही फुटपाथवरून वाहने कशी काय चालवली जातात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काहींनी असेही म्हटले की, केवळ पोलिसांवर दोष ढकलण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून नियम पाळणे अधिक गरजेचे आहे. पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे, तो वाहनचालकांच्या सोयीसाठी नाही, ही साधी बाब समजून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना आरसा दाखवण्याचे काम

रक्षक चौकातील या घटनेने पिंपरी-चिंचवडकरांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. परदेशी पाहुण्यांनी कोणतीही जबाबदारी नसताना दाखवलेली सामाजिक जाणीव आणि नागरी शिस्त अनेकांसाठी विचार करण्यास भाग पाडणारी आहे. हा व्हिडिओ केवळ एक क्षणिक व्हायरल कंटेंट न राहता, शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी एक इशारा ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी नियम पाळले, वाहतूक पोलिसांनी अधिक कठोर अंमलबजावणी केली आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचा सन्मान झाला, तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. अन्यथा, आपल्याला शिस्त शिकवायला परदेशी लोकच का लागतात? हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *