महाराष्ट्रात सध्या साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेटवरून एकच रणकंदन माजले आहे. विरोधी पक्षांनी या रॅकेटमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाचा म्हणजे प्रकाश शिंदे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः काँग्रेसने थेट एकनाथ शिंदे यांना आरोपीच्
.
प्रथम पाहू काय आहे सातारा ड्रग्ज प्रकरण?
मुंबई पोलिसांना गत 8 डिसेंबर रोजी मुलुंडच्या विजय नगरातील एका इमारती समोरील फुटपाथवर 2 व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना आढळले. सलीम अब्दुल हमीद शेख (32) व रईस शेख (37) अशी त्यांची नावे होती. सलीमकडे नायलॉनची पिशवी होती. त्यात एक लिफाफा व लिफाफ्यात नोटबूक होता. या नोटबूकच्या आतल्या पानात चिकटवलेल्या एका पिशवीत 10 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशातही 64 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. रईस शेखकडेही 62 ग्रॅम मेफेड्रोन आढळले.
पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी हे मेफेड्रोन पुण्याच्या विशाल मोरेंकडून आणल्याचे सांगितले. हा विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रगेसच्या अजित पवार गटाच्या पुणे विद्यार्थी आघाडीचा शहरप्रमुख आहे. पोलिसांनी 13 डिसेंबरला मेफेड्रोन खरेदी करायचे असल्याचे सागून मुंबई – पुणे हायवेवर बोलावले. त्यानंतर मेफेड्रोनसह त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत हे मेफेड्रोन साताऱ्याच्या सावरी गावात तयार होत असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या टीपच्या आधारावर मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी केली. तिथे गुरांच्या गोठ्यासारख्या एका शेडमध्ये मेफेड्रोन तयार करण्यात येत असल्याचे आढळले.

या ठिकाणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ओंकार दिघे व त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे व त्यांचा तेज यश रिसॉर्टचे नाव पुढे आले. पुढे मुंबई पोलिसांना ओंकार दिघेचा या प्रकरणात कोणताही सहभाग आढळला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण प्रकाश शिंदे यांच्यामागे आरोपींचा असा ससेमिरा लागला की, थेट एकनाथ शिंदेंचीच अडचण झाली आहे.
काय आहे काँग्रेसचा आरोप?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार असल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार आहेत. गत काही दिवसांत काँग्रेसने साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या 115 कोटींच्या ड्रग्ज साठ्याविषयी बऱ्याच गोष्टी समोर आणल्या आहेत. याच प्रकरणात समोर आलेले तेज यश रिसॉर्ट हे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेंच्या भावाचे आहे. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर एकनाथ शिंदे व प्रकाश शिंदे या दोघांचीही नावे आहेत. पण कारवाई केलेला प्रकाश शिंदे हा तो नाहीच असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.
या सर्व प्रकरणात सरळसरळ शिंदेंचे नाव येत आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील युवकांना ड्रग्जच्या नशेत बुडवण्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा हात आहे हे स्पष्ट होते. युवकांना ड्रग्जच्या नादी लावून कमावलेल्या पैशांतूनच शिंदेंच्या पक्षाचा कारभार चालतो हे ही उघड आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे पाब्लो एस्कोबार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण होता पाब्लो एस्कोबार?

जगातील अनेक लोकांनी व्यापार उदीम करून अब्जावधी रुपयांची संपत्ती कमावली. तर काही लोकांनी आपल्या काळ्या कारनाम्यांच्या जोरावर पैसा कमावला. पण कोलंबियन ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार एवढी संपत्ती कोणत्याही गुन्हेगाराला कमावता आली नाही. एकेकाळी पाब्लोचे दररोजचे उत्पन्न अंदाजे 400 कोटी रुपये एवढे महाभयंकर होते. 1989 मध्ये फोर्ब्स मासिकाने त्याचा उल्लेख जगातील 7 व्या क्रमांकाचे व्यक्ती म्हणून केला होता.
1993 साली त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची संपत्ती 80 अब्ज डॉलर्स अर्थात 6.72 लाख कोटी एवढी होती. लोक त्याला कोकेनचा राजा म्हणून ओळखत होते. पाब्लो नोटांचे बंडलं बांधण्यासाठी दर आठवड्याला 1 हजार डॉलर्सचे रबर बँड खरेदी करत होता. यावरून त्याच्या अफाट संपत्तीची कल्पना करता येते.
जगाच्या नजरेत माफिया, पण गरिबांसाठी रॉबिनहूड

पाब्लो जगाच्या नजरेत एक माफिया होता. पण कोलंबियातील बहुतांश लोकांसाठी तो रॉबिनहूड होता. पाब्लोने गरिबांसाठी शाळा, चर्च, खेळाचे मैदान बांधले. त्याचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. एकदा त्याच्या मुलीला रात्री खूप थंडी वाजत होती. शेकोटी पेटवण्यासाठी लाकडे नव्हती. त्यामुळे त्याने मुलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क डॉलर्सच्या नोटा जाळणे सुरू केले. त्याने एकेक बंडल करत तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स अर्थात 14 कोटी रुपये जाळून टाकले.
पाब्लो एस्कोबारचा जन्म कोलंबियाच्या एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एबेल शेती करत होते. तर आई शिक्षिका होती. आर्थिक तंगीमुळे पाब्लो यांचे शिक्षण अर्धवट सुटले. त्यानंतर नकली डिप्लोमा, अवैध सिगारेट व लॉटरी तिकिटांची विक्री तथा कार चोरीसारखे छोटे-मोठे गुन्हे करणे सुरू केले.
1970 साली सुरू केली कोकेनची तस्करी

पाब्लो एस्कोबारने 1970 च्या दशकात कोकेनची तस्करी सुरू केली. सुरुवातीला ते कोलंबियाहून पनामा व नंतर अमेरिकेपर्यंत कोकेनची तस्करी सुरू केली. या कामासाठी त्यांनी स्थानिक तस्करांचे एक जबरदस्त नेटवर्क तयार केले. 1976 मध्ये एस्कोबारने आपला चुलत भाऊ गुस्तावो गाविरियाच्या मदतीने मेडेलिन कार्टेलची पायाभरणी केली. ही एक संघटित गँग होती. ती कोकेनचे उत्पादन, तस्करी व वितरण सांभाळत होती.
पाब्लोने कोलंबिया व पेरूच्या शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढत कोकेनच्या शेतीवर नियंत्रण मिळवले. जंगलात गुप्त प्रयोगशाळा स्थापन केल्या. तिथे कोकेन रिफाइन केले जात होते. त्याचे तंत्र एवढे गुप्त व प्रभावी होते की, पोलिसांना त्याच्या कारवायांचा थांगपत्ताही लागत नव्हता. पाब्लोने तस्करीसाठी अनोखी पद्धत स्वीकारली. त्याने कोकेन अमेरिका व यूरोपर्यंत पोहोचवण्यासाठी छोटी विमाने व नौकांचा वापर केला. टायर्स, मासळ्यांचे डब्बे, फळांचे कंटेनर्स व कपड्यांमध्ये लपवून त्याची अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती.
ड्रग्जच्या वैश्विक जाळ्याची निर्मिती

पाल्बोने 1970 ते 1990 पर्यंत आपल्या ड्रग्जच्या साम्राज्याचा अमेरिका, यूरोप व इतर देशांपर्यंत विस्तार केला. त्याने यासाठी ‘लाच किंवा गोळी’ धोरण अवलंबले. तो लाच देऊन सरकारी अधिकारी व न्यायाधीशांना आपल्या जाळ्यात ओढत होता. जो लाच घेत नव्हता त्याची हत्या केली जात होती. एक काळ असा आला की, कोकेनच्या वैश्विक व्यवसायातील जवळपास 80 टक्के हिस्सा एकट्या एस्कोबारच्या नियंत्रणात होता. त्याची कमाई एवढी होती की, तो स्वतःला श्रीमंतांचा श्रीमंत म्हणवून घेत होता. हैसिएंडा नापोलेस येथे त्याने जवळपास 63 दशलक्ष डॉलर्स खर्चून 7 हजार एकरांत आलिशान महाल बांधला होता. त्यात प्राणीसंग्रहालय, बुलफायटिंग रिंग व विमान उतरण्यासाठी धावपट्टीही होती.
आठवड्याला 1 हजार डॉलर्सच्या रबर बँडची खरेदी

पाब्लो एस्कोबारचा अंमली पदार्थांचा धंदा चांगलाच फळास आला होता. त्याची दिवसाची कमाई 400 कोटींवर पोहोचली होती. हा सर्व धंदा रोख रकमेचा होता. त्यामुळे पाब्लोने पैसे ठेवण्यासाठी अनेक गोदामे बांधली होती. या गोदामांतील अब्जावधींच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या होत्या. पण त्याची कोणतीही फिकीर पाब्लोला नव्हती. कारण, कमाईच एवढी होती, तो नोटांची बंडले बांधण्यासाठी दर आठवड्याला 1 हजार डॉलर्सचे रबर बँड खरेदी करत होता.
नाइट क्लब असणारा स्वतःचा तुरुंग
पाब्लोने कोकेनचा धंदा वाढवण्यासाठी तस्करीच्या नवनव्या पद्धती विकसित केल्या. पाणबुड्या व विमानासह त्याची गँग पोकळ मूर्त्यांमध्ये भरून कोकेनची तस्करी करत होते. त्याच्याकडे स्वतःचे खासगी विमान व हेलिकॉप्टर होते. त्याचा वापरही ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी केला जात होता. पण हळूहळू तो कायद्याच्या कचाट्यात येऊ लागला. पण तिथेही पाब्लोने आपल्या श्रीमंतीचा थाट दाखवला.
1991 मध्ये अटक झाल्यानंतर कोलंबियन सरकारसोबत त्याने एक करार केला. त्या अंतर्गत त्याने ला कॅटेड्रल नामक स्वतःचा तुरुंग तयार केला. या तुरुंगात नाइट क्लब व धबधब्यासारख्या सुविधा होत्या. पण जनतेच्या टीकेनंतर अवघ्या वर्षभरातच हा करार मोडला. त्याला सरकारच्या तुरुंगात हलवण्यात येत असताना तो पोलिसांच्या तावडीतून यशस्वीपणे पळून गेला.
कसा झाला पाब्लो एस्कोबारचा मृत्यू?

कोलंबियन पोलिसांनी 2 डिसेंबर 1993 रोजी पाब्लो एस्कोबारचा खात्मा केला. त्यावेळी तो अवघ्या 44 वर्षांचा होता. त्याचा माग काढण्यासाठी अमेरिकन तपास यंत्रणेने कोलंबियन पोलिस व सरकारच्या मदतीने एक मोठी मोहीम राबवली. सर्च ब्लॉक नामक या पथकाने एस्कोबारचा तब्बल 2 वर्षांपर्यंत शोध घेतला. अखेरीस त्याच्या लपण्याचा ठिकाणा शोधण्यात यश आले.
पोलिसांनी पाब्लोच्या मेडेलिन स्थित घरावर हल्ला केला, तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी झालेल्या चकमकीत त्याचे डोके, पाय व छातीत गोळी लागली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पाब्लोचे जगभरात शत्रू होते. त्यामुळे त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या शत्रूंनी तब्बल 16 अब्ज रुपये खर्च केल्याचा दावा त्याच्या पत्नीने एका मुलाखतीत केला होता. पण काही लोकांच्या मते त्याने स्वतःला गोळी मारली होती. कारण, त्याची पोलिसांच्या हाती सापडण्याची इच्छा नव्हती. त्याच्या मृत्यूविषयी एक तिसरी थेअरी अशीही आहे की, त्याच्या भावानेच त्याचे साम्राज्य हस्तगत करण्यासाठी त्याचा काटा काढला होता.
पाब्लोच्या हिटमनने केले होते 300 मर्डर
क्लाउडिया कॅरसकिला यांनी पाब्लो एक्सोबार विरोधात अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. क्लाउडिया केवळ पाब्लोच नव्हे तर त्याच्या ड्रग कार्टेलशी संबंधित जवळपास 1000 लोकांविरोधात खटले लढले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पाब्लो एक क्रूर माणूस होता, पण त्याचा चीफ हिटमॅन जॉन जायरो व्लेलाजेक्वेज हा ही काही नव्हता. तो कुऱ्हाडीने जिवंत माणसाची चामडी सोलत होता.

पोपयेने आपल्या मृत्यूपूर्वी स्वतः पोलिसांना सांगितले होते की, त्याने 300 जणांची स्वतः हत्या केली. तर 3000 हून अधिक लोकांच्या हत्येच्या प्रकरणात त्याचा हात होता. तो पाब्लोच्या आदेशानुसार आपल्या शत्रूची हत्या केल्यानंतर त्याची चामडी सोलत होता. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून तो फेकून देत होता. अनेकदा हे काम तो आपल्या शत्रूंना इशारा देण्यासाठी करत होता. पोपये चामडी सोललेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रकच्या टायरमध्ये घालून जाळत होता.
राज्यात ड्रग्ज रॅकेटच्या घटना वाढल्या
महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून ड्रग्ज रॅकेटची प्रकरणे वाढली आहेत. आतापर्यंत पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी अनेक छापे पडलेत. त्यात राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांचा उल्लेख येताच या प्रकरणाला राजकीय रंग मिळतो. आता सातारा ड्रॅग्ज प्रकरणातही एकनाथ शिंदेंच्या भावाचे नाव आले आहे. त्यामुळे विरोधक चवताळलेत. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाते की राजकीय आरोपबाजीपुरतेच मर्यादित राहते? हे पहावे लागले. सत्य काय? हे तपासानंतरच स्पष्ट होईल.
शेवटी मेफेड्रोन म्हणजे काय?
मेफेड्रोन (4-methylmethcathinone किंवा 4-methyl ephedrone) एक कृत्रिम कॅथिनॉन आहे. हे एक मानवनिर्मित औषध आहे. ते सामान्यतः बाथ सॉल्ट म्हणून लेबल असलेल्या वस्तूंमध्ये आढळते. युनायटेड स्टेट्स ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन (डीईए) द्वारे शेड्यूल I नियंत्रित पदार्थ म्हणून सूचिबद्ध केले आहे. हे परदेशात किंवा देशात तात्पुरत्या प्रयोगशाळेत तयार केले जाऊ शकते. ते गोळी किंवा पावडरच्या स्वरूपात विकले जाते.
शहरी भागात राहणारे तरुण मेफेड्रोनचा सर्वाधिक वापर करतात. ते घेतल्यानंतर सहसा त्वरीत कार्य करते. त्याचा परिणाम ते घेतल्यानंतर 15 ते 45 मिनिटांच्या दरम्यान होतो. हे सहसा तोंडाने किंवा इनहेलेशनद्वारे घेतले जाते. मेफेड्रोनच्या वापरामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या न्यूरोट्रांसमीटरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. एकदा व्यक्तीने औषध वापरणे थांबवले की, परिस्थिती उलट होते आणि हे न्यूरोट्रांसमीटर मोठ्या प्रमाणात कमी होतात.
