Aaditya Thackeray Appointed Campaign Chief for Mumbai Civic Polls; Focuses on Youth & Urban Infrastructure | आदित्य ठाकरेच शिवसेनेच्या प्रचाराचे सेनापती: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीची सूत्रे हाती; राज्यातील प्रमुख महापालिकांवरही फोकस – Mumbai News



ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील प्रचाराची सूत्रं, विविध मेळावे, युवकांशी संवाद आणि निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी आदित्य ठाकरे पार पाडणार आहेत. विशेषतः युवा मतदारां

.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. विशेषतः देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी महायुती मुंबईत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रितपणे लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे, मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं चित्र आहे. पुढील आठवडाभरात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. बैठका, रणनीती, आढावे आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात असून, मुंबईच्या लढाईला विशेष महत्त्व दिलं जात आहे.

शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिकेतील कामकाजावर बारकाईने लक्ष राहिलं आहे. महापालिकेतील विविध प्रकल्प, विकासकामं, प्रशासक नेमल्यानंतर निर्माण झालेला गोंधळ, तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मुंबईकरांच्या रोजच्या अडचणी, नागरी समस्या आणि प्रशासनातील त्रुटी यांची त्यांना सखोल जाण असल्यामुळे प्रचारात कोणते मुद्दे अग्रक्रमाने मांडायचे, हे ठरवताना त्यांचा अनुभव उपयोगी ठरणार आहे. मेळाव्यांमधून जनतेशी थेट संवाद साधत, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका आदित्य ठाकरे घेताना दिसत आहेत.

नाशिक, पुणे आणि संभाजीनगरमध्येही प्रचार मेळावे

मुंबईव्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांचं लक्ष राज्यातील आणखी तीन ते चार महत्त्वाच्या महापालिकांकडे असणार आहे. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांमध्येही ते प्रचार मेळावे घेणार असल्याची माहिती आहे. राज्य निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार याद्यांमधील कथित घोटाळे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा यावरही आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका मांडत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवताना, पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे राज्यभर लक्ष ठेवत असताना, आदित्य ठाकरे शहरी महापालिकांमध्ये थेट मैदानात उतरलेले दिसत आहेत.

ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई

दरम्यान, येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे गटासाठी केवळ एक निवडणूक नसून, अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असा निर्धार पक्षाने केला आहे. आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळत, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून, मुंबईसह राज्यातील शहरी राजकारणाची दिशा या निवडणुकांमधून ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *