चार लाखांचे कॉईल ऑईल चोरीला; विमानतळ परिसरात दोन लाख २९ हजारांची रोकड हिसकावली

[ads1]

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड शहर व परिसरात चोरी, जबरी हिसकावणे तसेच आर्थिक फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण, विमानतळ आणि भोकर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

चार लाखांचे कॉईल ऑईल चोरीला

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एल.डी. स्टोन क्रशर कन्स्ट्रक्शन गट क्रमांक २०७, कांकडी, नांदेड येथील मोकळ्या जागेवर ठेवलेले सुमारे चार लाख रुपये किमतीचे डी.पी. मधील कॉईल ऑईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी धनराजसिंग कोहिनूरसिंग भारद्वाज (वय ३१, व्यवसाय कन्स्ट्रक्शन मॅनेजर, रा. शिवाजीनगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५८/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पचवलींग हे करीत आहेत.

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून २.२९ लाखांची रोकड हिसकावली

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ठाकर कॉम्प्लेक्स, आनंदनगर, नांदेड येथे धक्कादायक प्रकार घडला. सोनी जाधव, आकाश ठाकरे व यादव पूर्ण नाव माहित नसलेले या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस, “तुझ्याकडे खूप पैसे आहेत, आम्हाला पार्टी दे,” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील सोन्याची अंगठी व खिशातील २ लाख २९ हजार रुपये रोख असा मुद्देमाल हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भुषण दत्तात्रय शेळके (वय २९, व्यवसाय वकील, रा. स्नेहनगर पोलीस कॉलनी, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३२/२०२६, कलम ३०४(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

९७ जणांकडून कर्ज घेऊन १८.१८ लाखांचा अपहार

भोकर तालुक्यात भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडच्या आर्थिक व्यवहारात फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १८ फेब्रुवारी २०२३ ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अभय आंबादास राठोड, कपिल गौतम मिसाळे आणि कपिल संतोष जाधव यांनी संगनमत करून ९७ लोकांकडून कर्जाच्या हप्त्यापोटी १८ लाख १८ हजार ३८४ रुपये घेतले. मात्र ही रक्कम संबंधित शाखेत जमा न करता स्वतःकडे ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडचे मॅनेजर गजानन बालाजी बाशिंगे (वय ३२, रा. मुगट, ता. मुदखेड) यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८१/२०२६, कलम ३१६(४), ३१६(५), ३१८(४) बीएनएस-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी आंबेगावनाड हे करीत आहेत. तीनही घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसह आर्थिक व्यवहारांच्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *