Rani Mukerji Wins Hearts At Maharashtra State Film Awards In Traditional Look

[ads1]

मुंबई47 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

“माझ्यासाठी महाराष्ट्र केवळ एक राज्य नाही, तर महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे,” अशा भावना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिने व्यक्त केल्या. रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या ६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ स्वीकारताना राणी मुखर्जीने अस्खलित मराठीत भाषणाची सुरुवात करत उपस्थितांची मनं जिंकली.

मराठमोळा साज आणि राणीचा अप्रतिम अंदाज

या पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीच्या एन्ट्रीने सर्वांच्याच नजरा खिळल्या. राणीने या खास सोहळ्यासाठी अत्यंत सुंदर असा अस्सल मराठमोळा साज केला होता. हिरव्या रंगाची साडी, लाल रंगाचा पदर, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपरिक वेशात राणी अतिशय सुंदर दिसत होती. एवढेच नाही, तर पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी थेट मराठीतूनच आपल्या भाषणाची सुरुवात केली. तिच्या या मराठमोळ्या अंदाजाचा आणि भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सिनेमा माझ्यासाठी प्रोफेशन नाही, इमोशन आहे

आपल्या भाषणात राणी मुखर्जीने मुंबई आणि चित्रपटांबद्दलच्या तिच्या भावना अत्यंत मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी मायानगरी मुंबईमध्ये जन्मले, लहानाची मोठी झाले. माझे यश, अपयश सर्व काही मी इथेच पाहिले, प्रत्येक क्षण इथेच जगले. राज कपूर यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतोय, याचा मला प्रचंड अभिमान आहे.”

सिनेसृष्टीतील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी लहान वयात सिनेसृष्टीत आले, तेव्हा मला कुठपर्यंत जायचे आहे याचा काहीच रोडमॅप नव्हता. मी केवळ माझे काम सर्वोत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. मी नेहमीच भारतातील महिला आणि त्यांची शक्ती सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी अशी पात्रे निवडली ज्यांनी कधीही बॅकग्राउंडमध्ये राहणे पसंत केले नाही आणि जे स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याची वाट पाहत नाहीत. मी सिनेमाला कधीच फक्त प्रोफेशन म्हणून पाहिले नाही, तर तो माझ्यासाठी एक खोल ‘इमोशन’ आहे, आणि महाराष्ट्र त्या इमोशनचे घर आहे.”

मुंबईने मला ओळख दिली, हे पारितोषिक महाराष्ट्राला समर्पित

मुंबई शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राणी म्हणाली, “मुंबईने मला लहानाचे मोठे होताना पाहिले आहे. एक मुलगी, अभिनेत्री, पत्नी आणि आई म्हणून माझा प्रवास या शहराने पाहिला आहे. मुंबईने मला माझी ओळख दिली, मला माझे घर दिले, मला सुरक्षा दिली. त्यामुळे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे माझ्या मनात एक अत्यंत वेगळे आणि विशेष स्थान आहे.”

“हे पारितोषिक मी महाराष्ट्राच्या नागरिकांना, इथल्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि सिनेसृष्टीला समर्पित करते, ज्यांनी माझ्यासारख्या एका मुलीला स्वप्न पाहण्याची ताकद दिली. हे पारितोषिक पाहताना मला नेहमी माझी मुंबई आणि माझा महाराष्ट्र आठवेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असेच राहू द्या… जय हिंद, जय महाराष्ट्र!” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या भव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात राणी मुखर्जीसोबतच ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार’, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ आणि अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ‘व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

————-

हेही वाचा…

अमृता फडणवीस म्हणाल्या- जरांगे माझे भाऊ, त्यांनी घरी जेवायला यावे: मराठा आंदोलनादरम्यान दिले निमंत्रण; गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाचे केले होते समर्थन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आपला भाऊ म्हटले आहे. बुधवारी रात्री नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर त्या म्हणाल्या- जरांगेजी माझे भाऊ आहेत. ते माझ्या घरी जेवायला यावेत अशी माझी इच्छा आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *