वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिक घेणार शपथ:‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती : लोकसहभागातून संवर्धन
![]()
वसुंधरेच्या रक्षणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व नागरिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेणार आहेत. त्याचप्रमाणे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी. पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा. असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम जिल्ह्यात राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वाढते तापमान, पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृतीची गरज आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी कार्यवाही करावी. असेही सांगण्यात आले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि ऊर्जा या पंचमहाभूतांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. असे आवाहन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धनविषयक चर्चा, जनजागृती कार्यक्रम आणि शपथविधी आयोजित करण्यात यावेत. नागरिकांनी https://majhivasundh ara.in/en या पोर्टलवर जाऊन ई-शपथ घ्यावी. प्रमाणपत्र प्राप्त करावे. असेही आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. भावी पिढ्यांसाठी शहरात वृक्षारोपणाला होणार सुरुवात महानगरपालिकेद्वारे दरवर्षी सातत्याने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली जाते. आज तारखेडा, नमक फॅक्टरीजवळ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनपाने यंदा १० हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे. या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात समाजसेवी संघटना, संस्था, शाळा, महाविद्यालये यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
