लघुलेखक पदाच्या आमरण उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही

[ads1]

नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात लघुलेखक पदे महाराष्ट्र शासनाने मृत घोषित केले. पण महाराष्ट्रभर विविध शासकीय विभागांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त लघुलेखक पदे रिक्त आहेत. विभागांनी रिक्त पदांबाबत विचारणा केली असता सर्व विभागांना बाहेरुन मदत घ्या असे सांगून शासनाचे असंख्य गुपीत सार्वजनिक होण्याचा डाव आखला आहे. लघुलेखक पदाच्या शिक्षणातून शासनाला वर्षाला 400 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मग या लघुलेखक झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीनी शासनाच्या सेवेची अपेक्षा न ठेवता कंत्राटदाराकडेच नोंदणी करायची काय? असा प्रश्न युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
गेले 14 दिवस युवा विद्यार्थी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे. त्यातील एक विद्यार्थी आयसीयुमध्ये उपचार घेत आहे आणि दुसरी विद्यार्थीनी काही दिवसात आयसीयुमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. पत्रकार परिषदेत आपले मुद्दे उपस्थित करतांना सांगण्यात आले की, विष्णु कदम आणि सुमित धाडे या दोघांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेल्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे सांगितले सुध्दा आहे. राज्याच्या महसुल विभागात 394 लघुलेखकाची पदे रिक्त आहेत. महाराष्ट्रभराच्या विविध सरकारी विभागांमध्ये 3 हजाार पेक्षा जास्त लघुलेखक पदे रिक्त आहेत. 5 मे 2026 रोजी लघुलेखक पद हे मृतघोषित करण्याअगोदर कोणतीही नोटीस काढली गेली नाही. त्या संदर्भाने एखादी समिती स्थापन करून समितीचा अहवाल मागवला नाही. अचानकच रात्रीतून काढलेल्या या शासन निर्णय संदर्भाने बोलतांना विद्यार्थी संगिता हिंगमिरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गरीब कुटूंबातील मुलींनी लघुलेखक पदाचे शिक्षण घेवून चुक केली आहे काय? आम्ही चुल आणि मुल सांभाळण्यासाठीच जन्म घेतला आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला. अन्न त्याग करून भगवान पवार सध्या आयसीयुमध्ये आहेत आणि पुजा भुरके या आजही आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत. त्यांचा आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे उद्या-परवा त्यांना सुध्दा आयसीयुमध्येच जावे लागेल.
शासनाच्या गोपनियतेचे काय होईल हा प्रश्न उपस्थित करतांना विद्यार्थी सांगत होते की, थोड्याशा पगारीमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणारे लघुलेखक ती गुप्तता ठेवतील काय? यातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची होणारी हेळसांड पाहता भारताच्या राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. मग खरा मुद्दा हा आहे की, अशाच पध्दतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार झेन झी चा सत्यानाश करीत आहे काय? आमच्या आई-वडीलांना आम्ही आंदोलन करतांना काय उत्तर द्यावे. आमचे आई-वडील आंदोलन स्थळी येत आहेत आणि आम्हाला अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही काय द्यावीत असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
केंद्र सरकारच्यावतीने हिंदी आणि इंग्रजी लघुलेखक भरती सुरू आहे. मग महाराष्ट्रात मराठीच लघुलेखक का नको असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. मराठी लघुलेखकांमध्ये न्यायालयाला सुट दिली आहे. मग इतर विभागात ती भरती बंद का? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. इतर वर्षाला शासनाला जीसीसीटीबीसी मार्फत 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. खरे तर शासनाने अगोदर हे शिक्षणच बंद करायला हवे. मग मराठी लघुलेखक तयार होणार नाहीत. ज्यांनी लघुलेखक पदाकडे पाहुन आपले स्वप्न तयार केले. त्यांची स्वप्ने भंगणार नाही.दरवर्षी राज्यात 7 हजार लघुलेखक तयार होतात. मागील सहा वर्षापासून ही भरतीच झालेली नाही आणि आता ज्या विद्यार्थ्यांचे वय भरतीतील विहित पदाच्या वयापुढे गेले तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. एक विद्यार्थी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगत होता आज आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत पण आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही असंवेधानिक मार्गाकडे वळावे काय?
खरे तर शासनाने महसुल देणारे हे शिक्षणच बंद करावे. जेणे करून लघुलेखक तयारच होणार नाहीत. आत्महत्या करणार नाहीत आणि शासनाला काही मागणार नाहीत. पण ज्यांचे भविष्य संपुष्टात येण्याची भिंती वाटत असते. तो व्यक्ती काही सुध्दा करू शकतो हे मान्यच करावे लागेल. शासनाने आज लघुलेखक पद मृतघोषित केले आहे. पुर्वी सचिव पदासाठी सुध्दा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्‍या लोकांना संधी दिली होती. विरोधकांनी आणि लोकांनी आवाज उठवल्यानंतर ती प्रक्रिया बंद केली. काही ठिकाणी तहसीलदार पदासाठी सुध्दा अशाच पध्दतीच्या जाहिराती दिल्या होत्या. त्याही नंतर रद्द करण्यात आल्या. याचा अर्थ शासन सर्वच पध्दतीने सरकारी नोकर भरती बंद करून खाजगी करणाला जास्त महत्व देत आहे हे तेवढेच सत्य आहे.
या पत्रकार परिषदेत संघटनेच्यावतीने तुषार देशमुख, गोविंद पाटील, ग.सु.पडोळे, विष्णु कदम, साकेत माडगे, ज्ञानेश्र्वर मोरे, प्रभु सावते, हनुमान माहुरे, अंतेश्र्वर कानगुलवार, संतोष यन्नावार, विक्की गजेवार, अनिल ढेंबरे, शिवानंद कदम, मुंजाजी खराणे, सोनी राठोड, प्रणिता ढगे, संगिता हिंगमिरे, कोमल केंद्रे, पुजा वन्ने, जना पावडे, विद्या भोसले, श्वेता हिंगमिरे यांची उपस्थिती होती.


Post Views: 81






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *