[ads1]
![]()
अल् निनोच्या वाढत्या प्रभावामुळे मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. हे पाहून सर्व धरणातले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता रब्बी पिकांसाठीही या धरण्याती पाण्याचे नियोजन करण्यात येणार नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. जून ते ऑगस्ट या मुख्य मान्सूनच्या काळात सरासरीच्या तुलनेत अतिशय अल्प पाऊस झाल्याने शेतातील पिके तर करपलीच आहेत, पण त्याचसोबत भागातील प्रमुख जलाशये देखील कोरडीठाक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलत विभागातील पाण्याचे नियोजन पूर्णपणे बदलले आहे. रब्बीचा विचार नाही, प्राधान्य फक्त पिण्याच्या पाण्याला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील इतर सर्व लहान-मोठ्या धरणांमधील उपलब्ध जलसाठा 100% फक्त आणि फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता यंदा रब्बी हंगामासाठी धरणांतून पाण्याचे कोणतेही नियोजन केले जाणार नाही. नियम मोडल्यास थेट विद्युत पंप जप्त ज्या धरणांमध्ये आधीच अत्यल्प पाणीसाठा उरला आहे—उदा. मांजरा आणि माकणी प्रकल्प—तिथे विशेष दक्षता घेतली जात आहे. पाण्याचा बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी सर्व संवेदनशील जलस्त्रोतांवर विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. शेती किंवा इतर कामांसाठी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करणारे विद्युत पंप तात्काळ जप्त करून संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिना संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या (Canal Advisory Committee) बैठकीत पाणी वापराच्या पुढील वाटचालीचा आढावा घेतला जाईल. ऑगस्टमध्ये पावसाची तूट मोठी यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामाला सुरुवातीला काहीसा आधार मिळाला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावल्याने पावसाची तूट निर्माण झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या 86.2 टक्के पाऊस झाला. या कालावधीत सामान्य पावसाचे प्रमाण 815.3 मिमी असताना प्रत्यक्षात 702.6 मिमी पाऊस नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या केवळ 50.9 टक्के पाऊस झाला. यामुळे ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला खरीप पिकांसाठी पावसाची गरज अधिक वाढली आहे. पावसाची गंभीर आकडेवारी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) 1 जून ते 6 सप्टेंबर या कालावधीतील अहवालानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात वाईट परिस्थिती मराठवाड्याची आहे. या भागात तब्बल 34% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने तोंड फिरवल्यामुळे आगामी काळात नागरिकांना आणि प्रशासनाला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. इशारे होतायत खरे भारतीय हवामान विभागापाठोपाठ जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) ने देखील यापूर्वीच जागतिक हवामानाबाबत इशारा जारी केला आहे. संयुक्त राष्ट्र (UN) च्या या हवामान संस्थेनुसार, पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी वेगाने गरम होत असल्यामुळे जून ते ऑगस्टदरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता 80% आहे. नोव्हेंबरपर्यंत ते 90% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. अल निनो आणखी मजबूत होणार? अल निनो पुढे जाऊन आणखी मजबूत होऊ शकतो. यामुळे भारतासह जगभरात दुष्काळ, पूर, सागरी-भूभागावरील उष्णतेची लाट आणि हवामानाची धोकादायक रूपे पाहायला मिळू शकतात. या इशाऱ्यानंतर कृषी मंत्रालयाने राज्ये आणि संबंधित एजन्सींना ‘सामान्यपेक्षा कमी मान्सून आणि अल निनोच्या शक्यतेमुळे जिल्हा स्तरावर योजना लागू कराव्यात,’ असे निर्देश पूर्वीच दिलेत. अल निनो व दुष्काळ अल निनो आणि दुष्काळाचे नाते तसे जुनेच आहे. मागील 135 वर्षांचा मान्सूनचा भारतातील इतिहास सांगतो की, 1880 ते 2014 या काळात 90 टक्के अल निनोचा प्रभावी वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे 65 टक्के अल निनोचा प्रभावी वर्षे दुष्काळाची आहेत. यालाही काही अपवाद आहेत 1997-98 या वर्षात अल निनोचा मोठा प्रभाव असतानाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. तर 2002 मध्ये अल निनो फारसा कार्यरत नसतानाही दुष्काळी स्थिती होती. आयओडी म्हणजे? मान्सूनसाठी हिंदी महासागराच्या पूर्व व पश्चिम टोकाकडील (डायपोल) पाण्याचे तापमान महत्त्वाचे ठरते. अरबी समुद्राकडील भागाचे तापमान आणि बंगालच्या उपसागराकडील भागाचे तापमान यातील फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी). आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व हिंदी महासागराच्या आसपासचे देशांच्या हवामानावर आयओडीचा परिणाम होत असतो. अल निनो म्हणजे? विषुववृत्तीय क्षेत्रातील प्रशांत महासागराच्या पाण्याचे वाढलेले तापमान म्हणजे अल निनो. अल निनोची थंड व उष्ण आवर्तने सागर पृष्ठीय तापमान (एसएसटी) म्हणून ओळखली जातात. अल निनो आणि भारतीय मान्सून यांच्यात विरोधापाती संबंध आहे. प्रशांत महासागराचे तापमान वाढले की द.अमेरिकेकडून येणाऱ्या वाऱ्यांतील आर्द्रता भारतीय उपखंडाकडे येताना कमी होते व पर्जन्यमान घटते. (हे वृत्त अपडेट होत आहे…)
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad