पैठणहून येवल्याला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोची ट्रकला धडक:21 जण जखमी, सर्व जखमी पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवासी
![]()
वैजापूर-गंगापूर महामार्गावरील घायगाव शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील पाटेगाव येथून येवल्याला लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींच्या टेम्पो आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यात टेम्पोमधील २१ जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील काशिनाथ वाघ यांच्या मुलाचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथे लग्न होते. त्यासाठी पाटेगाव येथून टेम्पोने वऱ्हाडी नाशिककडे निघाले होते. ते वैजापूर-गंगापूर महामार्गावरील घायगाव शिवारात आले असता टेम्पो (एमएच २० ईजी ०१५८) समोरून येणाऱ्या ट्रकशी (जीजे २७ टीई ५५३५) जोरदार धडकला. माहिती मिळताच वैजापूर पोलिस, समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जेसीबी व टोविंग वाहनाच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमींमध्ये महिला, पुरुषांचा समावेश अपघातात गणेश जाधव (३०), अजय वाघ (१८), विशाल जाधव (१८), किसन वाघ (२०), रंजीत वाघ (२५), जयसिंग वाघ (२२), राम वाघ (२०), ज्ञानेश्वर वाघ (२०), जितेंद्र वाघ (१९), शालिनी सोनवणे (३५), सिद्धू वाघ (१९), श्रीनाथ वाघ (२०), कैलास वाघ (२०), चेतन वाघ (२५), सुनील वाघ (३०), सोन्या वाघ (२०), संतोष वाघ (२०), अजय सोनवणे (२०), अनिता वाघ (३५) तसेच दोन अज्ञात युवक (वय २३ व २५) हे जखमी झाले आहेत. डोळ्यांसमोर अपघात घडला ^मी दुचाकीवरून जात होतो. टेम्पो पुढील वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकची त्याला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की क्षणभर काय झाले हेच समजले नाही. एकच आरडाओरडा सुरू झाला. त्यावेळी मदतीसाठी आरडाओरड केल्याने अनेकजण धावत आले. – सुनील मगर, प्रत्यक्षदर्शी लग्नमंडपात पोहोचली अपघात घडल्याची बातमी पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील काशिनाथ वाघ यांच्या मुलाचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथे गुरुवारी लग्न होते. त्यासाठी पाटेगाव येथून टेम्पोने २१ वऱ्हाडी सकाळच्या वेळेस नाशिककडे निघाले होते. मात्र, त्यांचा घायगावजवळ अपघात झाल्याची बातमी लग्नमंडपात पोहोचताच नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.
