TikTok Car | ऑटोमोबाईल विश्वात खळबळ! TikTok कार बाजारात धुमाकूळ घालणार; पाहा भन्नाट फीचर्स

0
TikTok-Car.webp.webp


TikTok Car | चीनमधील ऑटोमोबाईल क्षेत्रात आणखी एक मोठी घडामोड घडणार असून टिकटॉकशी संबंधित तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवा कार ब्रँड बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहे. अत्याधुनिक एआय आणि क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात येणारी ही कार तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास डिझाइन केली जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चीनमधील वाहन उत्पादक कंपनी सेरेस ग्रुप (Seres Group) नवीन ऑटोमोबाईल ब्रँड सादर करण्याच्या तयारीत आहे. हा ब्रँड सायडो टेक्नॉलॉजी (Saidou Technology) या नावाखाली बाजारात आणला जाणार आहे. यापूर्वी ही कंपनी चोंगकिंग लँडियन टेक्नॉलॉजी (Chongqing Landian Technology) या नावाने ओळखली जात होती. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्स (ByteDance) यांच्या व्होल्कॅनो इंजिन (Volcano Engine) या क्लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाणार आहे.

अहवालानुसार, 2026 मध्ये या ब्रँडची पहिली कार बाजारात दाखल होईल. ही क्रॉसओव्हर प्रकारातील कार असेल, ज्यामध्ये एसयूव्ही (SUV) आणि सेडान (Sedan) या दोन्ही प्रकारांचे गुणधर्म पाहायला मिळतील. ग्राहकांसाठी ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन तसेच रेंज एक्स्टेंडर इलेक्ट्रिक वाहन (EREV) या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. या मॉडेलचे उत्पादन सेरेस फिनिक्स फॅक्टरी (Seres Phoenix Factory) येथे केले जाईल.

TikTok Car | एआय कॉकपिटसह तरुणांवर फोकस :

या कारमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे व्होल्कॅनो इंजिनकडून विकसित करण्यात येणारे प्रगत एआय कॉकपिट. हे सिस्टीम चालकाच्या आदेशांना समजून प्रतिसाद देणारे आणि स्मार्ट सहाय्यकाप्रमाणे काम करणारे असेल. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या नव्या पिढीला लक्षात घेऊन हे संपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. मात्र, बाइटडान्स कंपनी वाहनासाठी स्वयंचलित ड्रायव्हिंग तंत्रज्ञान विकसित करणार नसून तिची भूमिका सॉफ्टवेअर, क्लाऊड सेवा आणि एआय प्रणालीपुरती मर्यादित असेल.

लँडियन ब्रँडला कमी किमतीच्या वाहनांच्या विभागात अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता सायडो या नव्या ब्रँडच्या माध्यमातून सक्रिय जीवनशैली असलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यात येणार आहे. यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नवीन शोरूम सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

दरम्यान, शाओमी (Xiaomi) आणि लीपमोटर (Leapmotor) यांसारख्या कंपन्याही नवीन सब-ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्पर्धात्मक वातावरणात सेरेसची विक्री मात्र मजबूत राहिली आहे. मे 2026 मध्ये कंपनीने 33,476 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली असून जानेवारी ते मे 2026 या कालावधीत विक्रीत वार्षिक आधारावर 15.14 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

News Title: ByteDance Backed Smart EV Launch

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *