Pahlaj Nihalani Death | चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा! ‘या’ ज्येष्ठ निर्मात्याचं निधन
Pahlaj Nihalani Death | हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालय (Nanavati Hospital) येथे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पहलाज निहलानी यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे जवळचे मित्र शशी रंजन (Shashi Ranjan) यांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अखेर त्यांनी आपल्या राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ योगदानामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. ते तब्बल 29 वर्षे असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स (Association of Pictures and TV Programme Producers) या संस्थेचे अध्यक्ष होते. 2009 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हथकडी’ (Hathkadi) या चित्रपटातून त्यांनी निर्माते म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले. विशेष म्हणजे, गोविंदा (Govinda) आणि चंकी पांडे (Chunky Pandey) यांसारख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले.
Pahlaj Nihalani Death | वादग्रस्त पण प्रभावी कारकीर्द :
पहलाज निहलानी यांनी ‘गुनाहों का फैसला’, ‘पाप की दुनिया’, ‘मिट्टी और सोना’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आंखे’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती. यापैकी ‘आंखे’ हा चित्रपट 1990 च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता.
निर्मितीव्यतिरिक्त त्यांनी 2012 मध्ये ‘अवतार’ (Avatar) या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. तसेच 2008 मध्ये आलेल्या ‘हल्लाबोल’ (Halla Bol) चित्रपटात त्यांनी छोटेखानी भूमिकाही साकारली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या प्रचारगीतामुळे ते चर्चेत आले होते.
