डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार
![]()
अमरावती येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची निवड झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे आयोजित हे संमेलन आगामी ६ जून रोजी वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या सुकन्या आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते केले जाईल. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. भापकर यांनी काही वर्षांपूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. यापूर्वी अशी तीन स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव जे. पी. डांगे होते. दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र जाधव होते, तर तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष यशदाचे मानद संचालक हरिभक्त पारायण रंगनाथ नाईकडे होते. पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झाले होते. दुसरे संमेलन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या गुरुकुंज मोझरी येथील स्मृतिभवनात पार पडले, तर तिसरे संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कविवर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या तिन्ही संमेलनांना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हे संमेलन सातत्याने आयोजित केले जाते. या संमेलनातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच, ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे अनुभव, मार्गदर्शन, कवी संमेलन यांसारखे विविध उपक्रम या साहित्य संमेलनांद्वारे राबवले जातात.
