काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे काळाच्या पडद्याआड:वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, राजकीय वर्तुळात हळहळ

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-04t201553692_1780584424.jpg




राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे नेतृत्व करणारे अनंतराव थोपटे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ कॅबिनेट मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी विधानमंडळात काँग्रेसच्या गटनेतेपदाची धुराही अत्यंत यशस्वीपणे पेलली. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यात आणि पक्ष तळागाळात रुजवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले असून, ते माजी आमदार आणि भाजप नेते संग्राम थोपटे यांचे वडील होते. 6 वेळा आमदार आणि 14 वर्षे मंत्रिपद भोर तालुक्याच्या राजकारणात मोठे प्रस्थ असलेल्या थोपटे घराण्याचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी सलग 6 वेळा आमदारकी आणि तब्बल 14 वर्षे मंत्रिपद भूषवत या मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ यशस्वी नेतृत्व केले. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या अनंतरावांच्या शब्दाला काँग्रेस पक्षामध्येही मोठा मान होता. अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकर मांडेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1983 साली पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पुण्यात काँग्रेस पक्ष तळागाळात रुजवून त्याची ताकद वाढवण्यात अनंतराव थोपटे यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या या निधनाने काँग्रेस वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, 1983 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती. महत्त्वाचे खाते यशस्वीपणे सांभाळली आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनंतराव थोपटे यांनी उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, परिवहन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय आणि फलोत्पादन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. या शासकीय जबाबदाऱ्यांसोबतच, त्यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही उल्लेखनीय कामकाज पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *