प्रा. पंकजसिंह खांबरे, लेखक शेषराव खाडे यांचा सत्कार:ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाला गौरव
![]()
मोर्शी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाने शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तींचा नुकताच सत्कार केला. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्रा. पंकजसिंह खांबरे यांची जेएसपीएम विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल, तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी सचिव लेखक शेषराव खाडे यांची ‘कृत्रिम प्रज्ञा’ ही कादंबरी प्रकाशित झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. समाजासाठी गुणी मंडळींचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. प्रा. पंकजसिंह खांबरे हे माहिती तंत्रज्ञान शाखेचे तज्ज्ञ असून, त्यांनी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. प्लेसमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाची शिक्षण क्षेत्रातील सेवा मोठी असून, त्यांचे वडील प्रा. दिलीपसिंह खांबरे यांनी आयुष्यभर शिक्षणाची सेवा केली. पंकजसिंह यांनी ती परंपरा पुढे नेत उच्च शिक्षण क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. लेखक शेषराव खाडे यांनी महसूल, ग्रामविकास आणि लोकप्रशासन अशा विविध क्षेत्रांत उपायुक्त म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपली लेखनाची आवड जपली. ‘कृत्रिम प्रज्ञा’ ही त्यांची नवी कादंबरी वाचकांच्या भेटीला आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे, जो त्यांच्या लेखनातून दिसून येतो. ज्येष्ठ नागरिक महासंघाशी संलग्न असलेल्या येथील ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, उपाध्यक्ष दामोदर पवार, सचिव चंदनसिंह राजपूत आणि कोषाध्यक्ष धनराज निपाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गावंडे, पवार आणि पाथरे यांनी खांबरे कुटुंबाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. यावेळी प्रा. पंकजसिंह खांबरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच, लेखक शेषराव खाडे यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला, जिथे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या लेखनप्रवासाला शुभेच्छा दिल्या.
