नागपुरात एफडीएची मोठी कारवाई:'एनर्झल'सह 58 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

0
faaef8b3-ee18-4b7e-9e4c-2bd9f886d2cd_1780577149985.jpg




नागपूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुप्तवार्ता विभागाने मोठी कारवाई केली आहे. ३ जून २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत ‘एनर्झल’ आणि न्युट्रास्युटीकलसह एकूण ५८ लाख ४२ हजार ३९६ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला. गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने हिंगणा एमआयडीसी येथील मे. एफ. डी. सी. लिमिटेड या वितरक पेढीवर छापा टाकला. येथे ‘एनर्झल’ या पेयाच्या लेबलवर ‘एनर्जी अॅण्ड इलेक्ट्रोलिक ड्रिंक’ असे लिहिलेले आढळले. केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) २६ मे २०२६ रोजीच या उत्पादक कंपनीला हे पेय ‘मिथ्याछाप’ (misbranded) असल्याबाबत नोटीस पाठवली होती. नोटीस पाठवूनही नागपुरात ‘एनर्झल’ची अवैध विक्री सुरूच होती. त्यामुळे पथकाने विविध फ्लेव्हर्सच्या १,७९,६२७ बॉटल्स व पॅकेट्स असा एकूण ५५ लाख ६८ हजार रुपयांचा साठा जप्त केला. दुसऱ्या कारवाईत, धंतोली येथील ‘मे. न्यू रूट्स, स्कीन लेझर, हेअर क्लिनिक’ या आस्थापनेतून न्युट्रास्युटीकल पदार्थांचे चार नमुने घेऊन १ लाख ४२ हजार ८९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याव्यतिरिक्त, इतर विविध प्रतिष्ठानांमधून १ लाख ३१ हजार ७२७ रुपये किमतीचा १६१ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, भंडारा शहरातील दोन नामांकित औषध प्रतिष्ठानांवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रतिष्ठानांनी गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *