शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी, हे युतीच्या भविष्यासाठी चुकीचे:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन
![]()
विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला केला. अशा बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी ते योग्य नाही, असा सूचक इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला. तर भाजपमधील बंडखोरांना आज दुपारपर्यंत थंड करू, असे आश्वासन भाजपच्या वतीने गुलाबराव पाटलांना देण्यात आले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी जळगावची जागा भाजपने घेतल्याबद्दल आणि नाशिकमधील बंडखोरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी मोठी तडजोड केली आहे. आमच्या पाच जागा असतानाही आम्ही केवळ चार जागांवर समाधान मानले. मात्र, शिवसेनेला मिळालेल्या या चार जागांवरही जर कोणी बंडखोर उभे राहत असतील, तर तो आमच्यावर अन्याय आहे.” मोठ्या भावाने नीट लक्ष द्यावे गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही गुवाहटीचा उठाव केला नसता, तर आज काय स्थिती राहिली असती? त्यामुळे मोठ्या भावाने लहान भावाकडे निट लक्ष द्यावे ही सगळ्यांची अपेक्षा आहे. शिवसेनेला जेमतेम चार जागा आहेत आणि त्यातही बंडखोर उभे राहत असतील, तर हा आमच्यावर अन्याय आहे. असा अन्याय होता कामा नये. … तर हे युतीकरता चुकीचे एकनाथ शिंदेंनी अडचणीची कोणती बाब केलेली नाही. आमच्या ५ जागा सिटींग असल्यावर आम्ही ४ जागांवर समाधान मानलेले आहे. त्या ठिकाणी पण बंडखोरी होत असेल, तर हे युतीकरता पुढील काळात चुकीचे आहे, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. विधानसभेमधील बंडखोरांवर कोणतीही कारवाई नाही गुलाबराव पाटील म्हणाले, “दोघांनी प्रामाणिकपणे काम केले तरच चांगला रिझल्ट मिळणार आहे. जेमतेम चार जागा मिळाल्या आणि तिथे देखील बंडखोर उभे राहत असतील तर हे योग्य नाही. दोघांनी प्रामाणिकपणे काम केले तरच महायुती चालेल. नाहीतर महायुती कशी चालेल? कार्यकर्त्यांना समजवणार कसे? कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर बंडखोरी टाळणे महत्त्वाचे आहे. विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. जळगावमध्ये तर उलट बंडखोरी करणाऱ्यांना पद देण्यात आली. प्रभाकर गोटू सोनवणे यांना चार वेळा भाजप पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला.” दुपारपर्यंत बंडखोरांना ‘थंड’ करू: भाजपचे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, गुलाबराव पाटलांना इतकेच सांगायचे आहे की, ज्या ज्या ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झालेली असेल, तर ती बंडखोरी थंड करण्याचे काम आज दुपारपर्यंत केले जाईल. भाजपचा एकही बंडखोर शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उभा राहणार नाही. आम्ही या बंडखोरांना दुपारपर्यंत निश्चितपणे थंड करू. जर हे बंडखोर थांबले नाहीत, तर त्यांच्या विरोधात कारवाई देखील केली जाईल, असे नवनाथ बन म्हणाले. गुलाबराव पाटलांनी एवढा विश्वास ठेवावा, ज्या चार ठिकाणी शिवसेना लढणार आहे, त्या चारही जागा आणि उर्वरितही सर्व जागा महायुतीच्याच निवडून येतील, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला.
