नाशिक विधान परिषद:गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, गणेश गीतेंची माघार; पण भावाच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन कायम

0
db-temp-cover-marathi-2026-06-04t094204704_1780546397.jpg




नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीसमोर उभा ठाकलेला पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या खलबतांनंतर हा सकारात्मक निर्णय झाला असला, तरी महायुतीची चिंता पूर्णपणे मिटलेली नाही. गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने नाशिकच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. नाशिक भाजपमधील या अंतर्गत बंडखोरीचे लोण थेट मुंबईपर्यंत पोहोचल्याने गिरीश महाजन यांनी या वादात स्वतः लक्ष घातले होते. नाशिकमधील नेते निलेश बोरा आणि गणेश गीते कालपासूनच मुंबईत तळ ठोकून होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एका गुप्त ठिकाणी गिरीश महाजन, निलेश बोरा आणि गणेश गीते यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत महाजन यांनी पक्षाची शिस्त आणि भूमिकेची जाणीव करून देत, भविष्यात गीते यांचे ‘योग्य राजकीय पुनर्वसन’ करण्याचे आश्वासन दिले. महाजनांच्या या आश्वासनानंतर अखेर गणेश गीतेंनी अर्ज मागे घेण्यास संमती दिली. गोकुळ गीतेंचा ‘ट्विस्ट’; महायुतीची डोकेदुखी कायम? एकीकडे मोठ्या भावाने नमते घेतले असले, तरी धाकटे बंधू गोकुळ गीते यांनी घेतलेल्या पवित्रा महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. गोकुळ गीते हे गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारांच्या संपर्कात असून त्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. “कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. आता नाशिकला परतल्यानंतर गणेश गीते आपल्या भावाची समजूत कशी काढतात, यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे. “घरचा प्रश्न घरीच सोडवू,” असा विश्वास गणेश गीतेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. विजयाचा मार्ग सुकर होणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. जर गोकुळ गीतेंनी माघार घेतली, तर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होईल आणि भाजपमधील बंडखोरी पूर्णपणे शमल्याचे सिद्ध होईल. मात्र, गोकुळ गीते अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा थेट फटका अधिकृत उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आता गणेश गीते आपल्या भावाची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात का आणि नाशिकच्या या राजकीय संघर्षावर पडदा पडतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *