jalgaon-1_1781163437.gif


महाराष्ट्रात एकीकडे आधुनिक शेती, ड्रोन, स्मार्ट अॅग्रीकल्चर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील वास्तव मात्र अंगावर काटा आणणारं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून

.

आर्थिक संकटामुळे उरला नाही पर्याय

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे हे आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. त्यांनी उमरदे शिवारातील शेती कसण्यासाठी घेतली आहे. खरीप हंगामासाठी कपाशीची पेरणी करण्याची वेळ आली होती. मात्र बैलजोडी भाड्याने आणण्यासाठी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी आवश्यक पैसे त्यांच्याकडे नव्हते.

अखेर दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांचे दोन मुलगे गणेश आणि विनेश यांनीच वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांनी औताला स्वतःला जुंपून घेतले आणि दिवसभर चार एकर शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्या.

या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. मुलांच्या खांद्यावर औताचा भार आणि मागून वडील नांगर चालवत असल्याचे दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या वेदना किती खोल आहेत, याची कल्पना येते.

पाचोऱ्यातील हा व्हिडिओ केवळ एका कुटुंबाची कथा नाही. तो ग्रामीण भागातील आर्थिक असमानता आणि शेतीतील वाढत्या संकटांचे प्रतीक ठरत आहे. खरीप हंगाम सुरू होत असताना अनेक भागांत खतटंचाई, वाढते उत्पादन खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत मशागतीसाठी आवश्यक साधनसामग्रीही परवडत नसल्याचे चित्र अनेक गावांत दिसून येत आहे.

लातूरमध्ये पत्नीने घेतलं बैलाचं स्थान; मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

जळगावातील ही घटना चर्चेत असतानाच काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एक हृदयद्रावक प्रसंग राज्याने पाहिला होता. देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील शेतमजूर काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसात वीज पडून मृत्युमुखी पडला. गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर असून दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात दोन मुलगे आणि चार मुली आहेत.

ऐन पेरणीच्या हंगामात एकमेव बैल गमावल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नवीन बैल खरेदी करणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांच्या पत्नीने पुढाकार घेत स्वतःच खांद्यावर जू घेतले आणि बैलाच्या जागी नांगर ओढत शेतीची कामे सुरू ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

लातूरमधील हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत स्थानिक गोशाळेच्या माध्यमातून गायकवाड कुटुंबाला बैल उपलब्ध करून दिला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सविस्तर बातमी वाचा

शेतीतील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न

गेल्या काही वर्षांत खत, बियाणे, कीटकनाशके, इंधन आणि मजुरी यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र त्याच वेळी शेतीमालाला हमीभाव किंवा बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याची तक्रार शेतकरी सातत्याने करत आहेत. यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, काही ठिकाणी बैल विकणे, जनावरे कमी करणे किंवा शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक टाळणे अशा परिस्थिती निर्माण होत आहेत.

जळगावातील दोन मुलांनी नांगर ओढल्याची घटना ही केवळ एका कुटुंबाची कथा नाही. ती ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो लहान शेतकरी कुटुंबांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. शेती टिकवण्यासाठी आणि पेरणी वेळेत पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांनाही शेतात उतरावे लागत असल्याचे हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed