School Reopening | महाराष्ट्रातील शाळा कधी सुरु होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर
School Reopening | महाराष्ट्रातील शाळा सुरू होण्याबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर अखेर शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. शाळा उशिरा सुरू होणार, ऑनलाइन शिक्षण दिले जाणार किंवा उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल होणार अशा अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था नियोजित वेळेनुसार 15 जून 2026 पासून प्रत्यक्ष वर्गांसह सुरू होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्य मंडळाशी संलग्न सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान, हवामानातील बदल आणि इंधन दरवाढीमुळे शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शासनाने या सर्व शक्यता फेटाळून लावत पूर्वनियोजित वेळापत्रक कायम ठेवले आहे.
कोरोना काळानंतर ऑनलाइन शिक्षणाची सवय झाल्यामुळे यंदाही सुरुवातीला ऑनलाइन वर्ग सुरू होतील, असा समज अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यासाठी तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
School Reopening | विदर्भासाठी विशेष वेळा, अफवांपासून सावध राहा :
विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना आखली आहे. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. 30 जूनपासून मात्र नियमित वेळापत्रकानुसार शाळांचे कामकाज सुरू राहील. राज्यभर एकसमान शैक्षणिक दिनदर्शिका लागू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. (School Reopening Date)
दरम्यान, विदर्भातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने काही पालक आणि संघटनांनी 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तरीही सध्या शिक्षण विभागाचा आदेश कायम असून कोणताही नवीन निर्णय जाहीर झालेला नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या 26 जूनपासून शाळा सुरू होणार, सुट्ट्या वाढणार किंवा ऑनलाइन वर्ग भरवले जाणार अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत माहिती केवळ शासन, शिक्षण संचालनालय किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांकडूनच घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
