जून 2026 पासून पालकांच्या खिशाला कात्री:शालेय बस शुल्कात 15 टक्के वाढ; वाढती महागाई आणि देखभालीचा खर्च कारणीभूत
![]()
राज्यातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा फटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे. महाराष्ट्रातील शालेय बस चालक-मालक संघटनेने (SBOA) येत्या जून २०२६ पासून शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही दरवाढ लागू होणार असून, शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही वाढ केवळ इंधन दरवाढीमुळे नसून इतर अनेक खर्च पेलणे आता मालकांसाठी कठीण झाले आहे. दरवाढीमागे प्रमुख कारणे देण्यात आली आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. बस चालक आणि मदतनीस (क्लीनर) यांच्या पगारात झालेली वाढ. वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि सुट्या भागांच्या किमतीत झालेली मोठी वाढ. टोल नाक्यांवरील शुल्क आणि इतर परवाना शुल्कातील वाढ आणि ई-चलन आणि इतर कायदेशीर अंमलबजावणीमुळे पडणारा दंडाचा वाढता भार या कारणांचा समावेश आहे. शासनाच्या अनास्थेचा फटका? शालेय बस चालक-मालकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांबाबत राज्य परिवहन मंत्रालय आणि संबंधित यंत्रणांकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती. “आम्ही बस शुल्क वाढ टाळण्यासाठी सरकारला विविध पर्याय सुचवले होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा सवलती मिळाल्या नाहीत. या परिस्थितीत सेवा सुरू ठेवण्यासाठी दरवाढीशिवाय दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय आमच्यासमोर उरलेला नाही,” असे संघटनेने नमूद केले आहे. विमान वाहतुकीच्या धर्तीवर बस सेवाही महागली वाहतूक क्षेत्रातील वाढत्या खर्चाचा दाखला देताना संघटनेने म्हटले आहे की, ज्याप्रमाणे विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे, त्याचप्रमाणे शालेय बस उद्योगाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही वाढ आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, मात्र वाढता खर्च पेलणे आता कठीण झाले आहे. पालक आणि शाळांना सहकार्याचे आवाहन या निर्णयामुळे पालकांवर आर्थिक बोजा पडणार असून त्याबद्दल संघटनेने खेद व्यक्त केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि नियमांचे पालन करत सेवा सुरू ठेवण्यासाठी पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी या कठीण काळात समजूतदारपणा दाखवून सहकार्य करावे, अशी विनंती ‘एसबीओए’ (SBOA) संघटनेने केली आहे.
