पुण्यात घरांच्या विक्रीत 30 ते 35 टक्के घट:युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवड्यामुळे बांधकाम साहित्य महागले; किमती वाढणार
![]()
पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिका-इस्त्राइल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचा तुटवडा आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. यामुळे घरांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांना घरे विक्रीसाठी सल्ला देणाऱ्या ‘जस्टो’ कंपनीचे संचालक पुष्पमित्र दास यांनी ही माहिती दिली आहे. पुणे शहर हे माहिती तंत्रज्ञान (IT) हब, विद्येचे माहेरघर तसेच औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने देशभरातून अनेक कुटुंबे पुण्यात स्थायिक होण्यासाठी येतात. मात्र, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे महागाई वाढत असून, त्याचा दुष्परिणाम आता पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. पुण्यात दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० हजार कोटी रुपयांचे रिअल इस्टेट व्यवहार होतात. दास यांच्या मते, कोरोनानंतर घरांच्या मागणीत वाढ झाली असली तरी, नागरिकांच्या घरखरेदीच्या अपेक्षा बदलल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पगार स्थिर झाल्याने ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. पूर्वी ग्राहक दोनदा भेट देऊन घर खरेदीचा निर्णय घेत होते, आता त्यांच्या भेटींची संख्या चारपेक्षा अधिक झाली आहे. तसेच, एक महिन्यात होणारा खरेदीचा निर्णय आता तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी घेत आहे. नागरिक घर खरेदीसाठी घाई न करता उशीर करत आहेत, याचा परिणाम रिअल इस्टेट बाजारावर होत आहे. विक्री न झालेले प्रकल्प बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठे नुकसान ठरत आहेत, ज्यामुळे त्यांचे नवीन प्रकल्प रखडत आहेत. बांधकाम व्यावसायिकांसमोर आता आव्हान आहे की, सोसायटीत इतर सुविधा देण्याऐवजी घरांचा दर्जा चांगला करून कमी किमतीत उत्तम घर उपलब्ध करून द्यावे. बांधकाम क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून त्यावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. याशिवाय ते बाजारातील अर्थकारणालाही चालना देते. मात्र, आता या क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ लागल्याची चिन्हे आहेत. बांधकाम क्षेत्रात मजुरांची उपलब्धता महत्त्वाची असते, परंतु मजूर शेतीच्या कामासाठी मूळ गावी जातात आणि तिथे दीर्घकाळ राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मनुष्यबळाची टंचाई देखील बांधकाम क्षेत्रात जाणवत आहे. घरांची खरेदी कमी झाल्यास त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर जाणवतो.घर हे आयुष्यातील एक स्वप्न असते त्यामुळे ते घेण्यासाठी आता उपलब्ध गोष्टींचे योग्य नियोजन आणि अचूक निर्णय आवश्यक आहे.
