सातारा-तासगाव मार्गावर कारचा भीषण अपघात:नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक; महिलेचा वाहनाखाली दबून मृत्यू, दोघे जखमी

0
ezgifcom-resize-17_1780492343.gif




सातारा-रहिमतपूर-तासगाव मार्गावर मंगळवारी मध्यरात्री एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. तासगाव परिसरातील चिरेबंदी हॉटेलजवळ झालेल्या या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील काही नागरिक इनोव्हा कारमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान वाहन अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोरात धडकले. ही धडक इतकी भीषण होती की, कार अनेक वेळा पलटी होऊन तिचे मोठे नुकसान झाले. महिलेचा वाहनाखाली दबून मृत्यू या अपघातात सुनीता धनाजी जाधव (वय ३६, रा. गुरसाळे) यांचा मृत्यू झाला आहे. धडक बसताच त्या वाहनाबाहेर फेकल्या गेल्या आणि पलटी झालेल्या कारखाली अडकल्या गेल्या. दुर्घटनेची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम आणि हायवे रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवून त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात कारमधील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अमर लतीफ मुलाणी (वय ३३) आणि धनाजी शिवाजी जाधव (वय ४८) अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही जखमींवर सध्या सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. वाहनाचा वेग जास्त असल्याने किंवा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *