डॉ. भावार्थ देखणे: अधिक मासात भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करा:श्री महालक्ष्मी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0
4de8d81e-f0f3-4d6d-9a82-b49bef7ed736_1780480448977.jpg




भारतीय संस्कृतीत अधिक मासाचे महत्त्व मोठे आहे. हा मास आनंद आणि हर्षाने साजरा केला जातो. या माध्यमातून आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रयोजन साधले जाते आणि भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करण्याचे काम होते, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे अधिक मासानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये डॉ. देखणे यांची प्रवचन सेवा झाली. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांच्यासह प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी या उपक्रमांचे संयोजन केले आहे. डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले की, भगवंताच्या उपासनेसाठी एक महिना अधिक देण्यात आला आहे, जेणेकरून अधिकाधिक सेवा करता यावी. चांगले विचार कानावर पडावेत, हे देखील त्यामागील एक महत्त्वाचे प्रयोजन आहे. आपण कोणत्याही माध्यमातून सेवा करावी, कारण सर्व सेवा भगवंतापर्यंत पोहोचतात. नामस्मरण आणि श्रवण सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वरी हा श्रोतृ संवाद असून, त्यातून ज्ञानेश्वरी घडत गेली, हे श्रवण सेवेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात सोमवार, १५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजल्यानंतर विविध उपक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना आणि दीप उत्सव यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तक तुला, गो माता अन्नकोट, झुला उत्सव आणि धान्य तुला दान यांचा समावेश आहे. देवी भक्तांनी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *