नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी
![]()
नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. “हे निदा खान प्रकरण अत्यंत गंभीर असून ते अजिबात लहान नाही. यामागे लव्ह जिहाद, जबरदस्तीने लग्न लावून देणे आणि अशा देशविघातक गोष्टींना मोठ्या प्रमाणावर पैशांचा पुरवठा करणे असे अनेक मोठे धागेदोरे आहेत. निदा खान ही महिला एकटी इतके मोठे कृत्य करूच शकत नाही. नाशिकमधील गुन्हा उघडकीस आल्यानंतर ती आधी मुंब्रा येथे पळून गेली आणि तिथून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आली, जिथे तिला जाणीवपूर्वक लपवण्यात आले.” इम्तियाज जलील संशयाच्या भोऱ्यात संजय शिरसाट यांनी सांगितले की, “या प्रकरणात नाव आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी चौकशीदरम्यान थेट इम्तियाज जलील यांचे नाव घेतले आहे. “गुन्हेगाराला आश्रय देणे हा देखील गुन्हाच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता एफआयआरच्या आधारे इम्तियाज जलील यांची तातडीने चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, फडणवीस यांनी कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही,” असे आश्वासन दिल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय देण्याचे कुणाचे आदेश? दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. पोलिसांनी मतीन पटेल याचा मोबाईल फोन जप्त केला असून, तांत्रिक विभागामार्फत त्यातील जुना डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मतीन पटेलच्या फोनवरून संशयास्पद काळात इम्तियाज जलील आणि इतर बड्या पदाधिकाऱ्यांशी संभाषण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निदा खान फरार असताना तिला संभाजीनगरमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी मतीन पटेलला नेमके कोणाचे आदेश होते, याचा शोध एसआयटी घेत आहे. नाशिक पोलिसांनी यापूर्वीच मतीन पटेलची दोनदा चौकशी केली असून, त्याला पुन्हा एकदा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्यानंतर संशयाची सुई एमआयएमभोवती असल्याने आणि थेट माजी खासदारांचे नाव समोर आल्याने पोलिसांनी तपासाचा फास आवळला आहे. मतीन पटेलच्या चौकशीतून आणि मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून कोणते नवीन खुलासे होतात आणि इम्तियाज जलील यांच्यावर काही कारवाई होते का? हे आता पाहावे लागणार आहे.
