नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ३ लाखांच्या चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद

0
WhatsApp-Image-2026-06-03-at-14.37.47.jpeg


नांदेड (प्रतिनिधी)- ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत ३ लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शिवाजी राजाराम निलपत्रेवार (वय ४६, रा. विनकर कॉलनी, धनगाव, नांदेड) यांनी ३१ मे २०२६ रोजी तक्रार दिली होती. त्यांची मोटारसायकल ३१ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान सरस्वती दवाखान्यासमोर, विष्णुपुरी येथून चोरीला गेली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत लखन शिवाजी हातागळे (वय २१, रा. नवीन आबादी, मुखेड, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने मोटारसायकल चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून हिरो होंडा स्प्लेंडरच्या चार व टीव्हीएस डिलक्सची एक अशा एकूण पाच मोटारसायकली जप्त केल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच  अंमलदार वसंत केंद्रे,मारोती पंचलिंग,सचिन चावरे,समिर अहेमद,धम्मपाल कांबळे,शंकर माळगे,सुरेश नागरगोजे,शिवानंद तेजबंद यांचा समावेश होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली वाहने जप्त करून मूळ मालकांना परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली असून प्रकरणाचा अधिक तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *