विप्रो कर्मचाऱ्याचा बळजबरीने राजीनामा घेतल्याचा आरोप:हिंदू महिलेला धर्मांतरासाठी दबाव, 'कॉर्पोरेट जिहाद'चा दावा

0
0765ddad-ab3a-4902-ac12-43c06d59b3aa_1780482344153.jpg




पुण्याच्या हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या दबावाला नकार दिल्याने तिला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेने स्वतः पत्रकार परिषदेत उपस्थित राहून विप्रो कंपनीतील छळाची माहिती दिली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीचे ॲड. विवेक भोसले, ॲड. गोपाळ तेलंग आणि रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर उपस्थित होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती विप्रोमध्ये कार्यरत असताना तिच्याच टीममधील एका महिला सहकाऱ्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. या सहकाऱ्याने पीडित महिलेला तिच्या ओळखीच्या ‘शेख’ नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यासाठी सतत दबाव आणला. तसेच, दुबईत ऐषोआरामात जीवन जगण्याचे प्रलोभनही दाखवले. या त्रासाला कंटाळून पीडितेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, विप्रो प्रशासनाने आरोपी महिलेवर कारवाई करण्याऐवजी पीडितेचाच छळ केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकारी वसीम आणि एचआर कमिटीचे सदस्य झीशान अहमद यांनी दोषी महिलेला पाठीशी घातले. ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस, एचआर प्रतिनिधी प्रशांत जी.आर. यांनी एका ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’ मीटिंगदरम्यान लॅपटॉपचा स्क्रीन कंट्रोल स्वतःकडे घेऊन पीडितेच्या संमतीविना तिच्याच सिस्टीमवरून तिचा राजीनामा सादर केला. अधिवक्ता विवेक भोसले यांनी स्पष्ट केले की, कोणतीही पूर्वसूचना व चौकशी न करता अशा प्रकारे राजीनामा घेणे हे कामगार कायद्यांचे उल्लंघन आहे. या संस्थात्मक अन्यायाविरोधात पीडितेने वकिलांमार्फत विप्रोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बळजबरीने घेतलेला राजीनामा रद्द करून पूर्ण वेतनासह नोकरीवर पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि अधिकृत लेखी माफीचीही मागणी केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पुण्याच्या आयटी क्षेत्रातील हा हिंदूविरोधी अजेंडा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. तसेच, अशा छळाला बळी पडणाऱ्या हिंदू महिलांनी न घाबरता हिंदु जनजागृती समितीच्या ७७३८२३३३३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, विप्रो कंपनीशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *