पुणे विषारी दारू प्रकरण: तपासासाठी 10 पथके नियुक्त:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर सीआयडीकडून कारवाईला वेग

0
3df119ed-170f-4779-9fbb-44b80023b605_1780482709466.jpg




पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, सीआयडीने १० विशेष पथके नियुक्त केली आहेत. शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर ही कारवाई अधिक व्यापक करण्यात आली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सुरुवातीपासून गंभीर दखल घेतली होती. मंगळवार, २ जून रोजी त्यांनी सीआयडी पुणे कार्यालयाला भेट देऊन तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी तपास अधिक व्यापक करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. सीआयडी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दापोडी व हडपसर येथील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. दापोडी प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे या आरोपींना अटक केली होती. या आरोपींना सीआयडीच्या तपासातही अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने ठाणे येथे दाखल केलेल्या संबंधित गुन्ह्यातील आरोपींना देखील सीआयडी तपासात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान, विविध घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, दारूचे नमुने आणि इतर पुरावे जप्त करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. मेथेनॉल पुरवठा साखळीतील दोन महत्त्वाचे संशयित निष्पन्न झाल्याची माहिती सीआयडीने दिली असून, त्यांच्याकडून अधिक माहिती व पुरावे मिळवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक शामराव काळे (8237229208) आणि सचिन चव्हाण (9011334580) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नागरिकांना या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी आणि पारदर्शकपणे व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांचा सीआयडीवरील विश्वास अधिक दृढ करत दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *