पैठण हादरले!:पतीनेच केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात थरार

0
origdownload1700696661-4_1780470292.jpg




पैठण शहरात अल्पवयीन मुलाच्या खुनाची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 3) सकाळी एका पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील झाडझुडपांनी वेढलेल्या पाणवठ्याजवळ ही घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मंदाबाई सुरेश अंगारखे (वय 45, रा. गांगलवाडी, नारळा, पैठण) असे आहे. तर आरोपी पती सुरेश अंगारखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश व मंदाबाई अंगारखे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील झाडझुडपे असलेल्या भागात सरपणासाठी लाकडे तोडण्यास गेले होते. यावेळी आरोपी सुरेश अंगारखे याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर व शरीरावर सलग तीन वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंदाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ..पोलिस ठाण्यात दाखल होत दिली कबुली घटना घडल्यानंतर आरोपी सुरेश अंगारखे थेट पैठण पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे त्याने पोलिसांना, “मी माझ्या बायकोला कायमचे संपविले, असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, ऋषिकेश तळेकर, पोलिस कॉन्स्टेबल शुभम पाटील, कल्याण ढाकणे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच खुनासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. आरोपीने पत्नीचा खून नेमक्या कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पैठण पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.या घटनेमुळे पैठण शहरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *