पैशाच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपी अटकेत – VastavNEWSLive.com
हदगाव(प्रतिनिधी) :- तालुक्यातील निवठा बाजार येथे पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना 31 मे 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नारायण कदम (वय 24, रा. निवठा बाजार, ता. हदगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादातून आरोपी अब्दुल खुद्दूस शेख (वय 24), शहिद खान (वय 21), तनु उर्फ तन्वीर शेख (वय 18) व आयान यांनी संगनमत करून विजय कदम याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विजय कदम गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारांनाही मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली.
या प्रकरणी नारायण वामन कदम (वय 50, रा. नवी आबादी, निवठा बाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 179/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 115(2), 118(1), 352 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास हदगाव पोलीस करत आहेत.
Post Views: 39
