सुप्रिया सुळे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना आक्रमक पत्र:पुण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर थेट सवाल
![]()
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना एक खरमरीत पत्र पाठवले आहे. पोलिस प्रशासनाने सादर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर बोट ठेवत, सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे पुणेकर दहशतीखाली जगत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सुळे यांनी पत्रात अलीकडच्या काळात पुण्यात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हाळुंगे येथे बालकावर अत्याचार करून झालेला खून, हडपसर परिसरात सापडलेली बॉम्बसदृश वस्तू, नऱ्हे गावात भरदिवसा कोयते आणि तलवारी उपसून टोळ्यांनी घातलेला हैदोस, तसेच दिवे घाटात रिक्षाचालकावर हल्ला करून त्याला पुलावरून खाली फेकून देण्याच्या घटनेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, येरवडा आणि हडपसरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची दिवसाढवळ्या झालेली हत्या, शहरात खुलेआम विकले जाणारे अमली पदार्थ आणि पुण्यात विषारी दारूमुळे तब्बल २० जणांचा बळी गेल्याच्या घटनेकडे त्यांनी पोलिसांचे गंभीर लक्ष वेधले आहे. आपल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी पोलिस प्रशासनासमोर काही रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. कागदी आकडेवारी गुन्हे कमी झाल्याचे सांगत असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण का आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच, पोलिस आणि नागरिकांमधील संवाद कमी झाला आहे का, याची विचारणा केली. गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचा दावा केला जात असताना शहरात जमावबंदीचे आदेश का लागू करावे लागत आहेत, हा पोलिसांच्या दाव्यांमधील मोठा विरोधाभास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर शहराची वाईट प्रतिमा तयार करण्यासाठी कोणी चुकीचे ‘नरेटिव्ह’ पसरवत असेल, तर त्यांच्यावर ठोस कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही सुळे यांनी विचारला. तसेच, तंत्रज्ञानाचा वापर कौतुकास्पद असला तरी, केवळ त्यावर विसंबून न राहता पोलिसांनी प्रत्यक्षात रस्त्यावर आणि जमिनीवर आपली उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून गुन्हे घडण्यापूर्वीच रोखता येतील, असे त्यांनी सुचवले आहे. “पुणे हे विद्येचे माहेरघर आणि शांतताप्रिय शहर आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या मांडणे हे माझे घटनात्मक कर्तव्य आहे. माझी टीका पोलिस दलाचे मनोबल खच्ची करण्यासाठी नसून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आहे. पुणेकरांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर आणि दृश्यमान कारवाई करावी,” अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
