स्वच्छ प्रशासनासाठी आम्ही अविश्वास ठरावालाही सामोरे जाण्यास तयार:नगराध्यक्ष वडजे यांची माहिती, नाईकवाडींचा नगराध्यक्षपदावर दावा
![]()
हाच तो इस्लाम पेठेतील निकृष्ट रस्ता, एकाच महिन्यात उखडल्यावर जेसीबी मशीनने उखडून फेकला. प्रतिनिधी | अकोले अकोले नगरपंचायतीमधील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपचे विद्यमान गटनेते बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात अविश्वास दाखवत माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी गटनेतेपदावर दावा ठोकला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अकोले नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांना अंतिम सुनावणीची नोटीस बजावली असून, यामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडगाली आहे. या वादावर खोचक प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे म्हणाले, जनतेने आम्हांला विकासाच्या कामांसाठी निवडले आहे, पदासाठी नाही. आम्ही इस्लाम पेठेतील नवीन पण निकृष्ट झालेला रस्ता उखडून लावला आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई केली. तसेच पानसरवाडी येथील अनियमितता असलेल्या कामाची देयकेही रोखली. यामुळे आमच्या स्वच्छ कारभारावर काही नगरसेवक नाराज आहेत. जर आम्ही या निकृष्ट कामांना पाठीशी घातले असते, तर ते नाराज झाले नसते. पण स्वच्छ प्रशासनासाठी आम्ही अविश्वास ठरावालाही सामोरे जाण्यास तयार आहोत. या संधीचा फायदा घेत विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांनी भाजपविरोधातील राजकीय हस्तक्षेप तीव्र केला असून, यामुळे वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. सोनाली नाईकवाडी यांनी गटनेतेपदात बदल करून स्वतःच्या नावाची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. यावर ६ मे २०२६ रोजी झालेल्या सुनावणीला वडजे गैरहजर होते. त्यानंतर २० मे रोजी दोन्ही बाजूंना ओळखपत्रासह व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता ही सुनावणी आचारसंहितेनंतर होणार आहे. गटनेतेपदाच्या या वादामुळे नगरपंचायतीच्या १५ पैकी १२ नाराज नगरसेवकांनी कामात असहकार पुकारल्याने शहराच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसीमध्ये नगरसेवक सागर चौधरी, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, सोनाली नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, शीतल वैद्य, वैष्णवी धुमाळ, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, शरद नवले, माधुरी शेणकर आणि कविता शेळके यांना पक्षकार करण्यात आले आहे. सध्या नाईकवाडी गटाने आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या स्थानिक गटात फूट गटनेतेपदाचा वाद थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने भाजपच्या स्थानिक गटात उभी फूट पडली. वडजे हे निवडणूक आल्यापासून दीर्घकाळ गटनेतेपदी आहे. तर नाईकवाडी गटाने आपल्याकडेच संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भाजपचे १२ पैकी बहुसंख्य नगरसेवक कुणाच्या बाजूने उभे राहतात, यावर सत्तेचे समीकरण अवलंबून आहे. वडजे मागील सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे नाईकवाडी गटाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आपली बाजू भक्कम केल्याचे चित्र आहे.
