इंडिया आघाडी मोदीद्वेषातून एकत्र:दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टोला
![]()
शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. अनेक दिवसांपासून कार्यकारिणी बैठक व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे शिंदेंनी सांगितले. तसेच त्यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, इंडिया आघाडी ही देशहितासाठी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून एकत्र आली आहे. देशाच्या विकासाचा वेग आणि प्रगती काही पक्षांना पाहवत नसल्याने त्यांनी एकत्र येण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र जनतेला विकास हवा आहे, राजकीय द्वेष नव्हे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सतत पंतप्रधान मोदींवर टीका करण्याऐवजी देशासाठी केलेले काम जनतेसमोर मांडावे, असा टोला त्यांनी लगावला. वर्षभर देशभर फिरून केवळ आरोप करण्यापेक्षा विकासासाठी काय योगदान दिले, हे दाखवून द्यावे, असेही शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंचे यांचे नाव न घेता टीकास्त्र उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. इंडिया आघाडीच्या बैठकीत काही नेते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत आणि ऑनलाइन सहभागी झाले, यावरूनही त्यांनी खोचक टिप्पणी केली. तसेच तृणमूल काँग्रेसवरही टीका करत विरोधी आघाडीतील मतभेद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठका आणि आरोप-प्रत्यारोप यापेक्षा केंद्र सरकारची विकासकामे जनतेसमोर अधिक महत्त्वाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय? ठाकरे गटाला खिंडार पडणार? या दौऱ्यातील सर्वात धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही विद्यमान खासदार दिल्लीत गुपचूप एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते त्यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य असेल, तर ठाकरे गटाला दिल्लीत पुन्हा एकदा मोठा झटका बसू शकतो. यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकाच महिन्यात दुसरा दौरा; ‘गुपित’ काय? विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही एकनाथ शिंदे यांनी असाच एक अत्यंत गोपनीय आणि अचानक दिल्ली दौरा केला होता. कोणत्याही सहाय्यकाला सोबत न घेता अत्यंत गुप्तता पाळत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काही माजी मंत्रीही असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या भेटीचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असतानाच, आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच शिंदे पुन्हा दिल्लीत दोन दिवस मुक्काम करणार असल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती ‘मोठी बातमी’ किंवा भूकंप येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
